कल्याण – कल्याण जवळील शहाड आंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तपोवन एक्सप्रेसने दरवाजात उभा राहून प्रवास करणाऱ्या नाशिक येथील एका शेतकऱ्याच्या हातावर रेल्वे मार्गा लगत उभ्या असलेल्या अल्पवयीन चोरट्याने लोखंडी पट्टीने रविवारी जोरदार फटका मारला. या फटक्यात शेतकरी मोबाईलसह एक्सप्रेसजवळ रेल्वे मार्गालगत पडला. यावेळी प्रवाशाचा एक पाय एक्सप्रेसखाली आल्याने त्याला आपला एक पाय गमावावा लागला. चोरट्याने शेतकऱ्याजवळील रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळ काढला.

या घटनेमुळे शहाड, आंबिवली, विठ्ठलवाडी रेल्वे मार्गालगत पुन्हा मोबाईल, पैसे चोर चोरटे सक्रिय झाले आहेत. यापूर्वी कसारा, आसनगाव, टिटवाळाकडे, नाशिककडे जाणाऱ्या एक्सप्रेस, लोकलमधील दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर लोखंडी सळई, पट्टीने फटका मारून मोबाईल, हातामधील पैशाचा बटवा पळून नेण्याच्या घटना शहाड, आंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडल्या आहेत. तेव्हापासून शहाड, आंबिवली, विठ्ठलवाडी एफ केबीन पूल भागात नेहमीच रेल्वे पोलिसांची गस्त असते.

नाशिक येथील एक शेतकरी गौरव रामदास निकम आपली मुंबईतील कामे उरकून रविवारी तपोवन एक्सप्रेसने नाशिक येथे निघाले होते. ते एक्सप्रेसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. मोबाईलवर बोलत असताना एक्सप्रेस कल्याण जवळील शहाड आंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान संथगतीने धावत होती. यावेळी रेल्वे मार्गालगत उभ्या असलेल्या एका सराईत अल्पवयीन मुलाने शेतकऱ्याच्या हातामधील मोबाईल चोरण्यासाठी त्यांच्या हातावर लोखंडी पट्टीचा जोरदार फटका मारला. दरवाजाच्या कडीला धरलेली हाताची पकड सैल झाल्याने गौरव एक्सप्रेसमधून खाली पडले. त्यांचा एक पाय रूळावर पडल्याने एक्सप्रेस त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांना एक पाय गमवावा लागला. दुसऱ्या पायाला दुखापत झाली आहे.

चोरट्याने गौरव यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून आणि जवळली रोख रक्कम काढून घेऊन पळ काढला. ही माहिती लोहमार्ग पोलिसांना कळली. तातडीने पोलीस रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. गौरव निकम यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा सराईत चोरटा असल्याचा अंदाज व्यक्त करून पोलिसांनी यापूर्वी या भागात असे गुन्हे केलेल्या आरोपींची यादी काढली. त्यांचा शोध सुरू केला. तसेच, शहाड आंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गौरव निकम ज्या भागात रेल्वे मार्गाजवळ पडले होते. त्या भागात येण्यासाठी असणाऱ्या पोहच रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांनी तपासणी केली.

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी गौरव निकम यांच्या हातावर फटका मारून पळून जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शहाड आंबिवली भागातून अटक केली. हा अल्पवयीन मुलगा सराईत चोरटा असल्याचे आणि त्याच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली. रेल्वे प्रवासी संघटनांनी हा चोरटा अल्पवयीन असला तरी त्याला कठोर शिक्षा होईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची मागणी कली आहे.