ठाणे : शहापूर तालुक्यातील हाली बरफ या आदिवासी कन्येने लहान वयात आपल्या लहानग्या बहिणीचे वाघाच्या हल्ल्यातून प्राण वाचवले होते. ही घटना संपूर्ण देशभर गाजली होती. तिच्या या पराक्रमाबद्दल तिला देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते २०१२ साली “राष्ट्रीय शौर्य पुरस्कार” ही देण्यात आला होता. हाली बरफ यांच्या शौर्याची दखल घेत महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तकांत ” धाडसी हाली ” नावाने धडा देखील आहे. मात्र शहापूर तालुक्यातील हाली सध्या बेरोजगारीच्या गर्तेत सापडल्या असून, त्यांना जंगलातील गवत कापून त्याची विक्री करून जगावे लागत आहे. यामुळे हाली यांना रोजगार मिळावा यासाठी श्रमजीवी संघटनेकडून जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
हाली बरफ या शहापूर तालुक्याच्या रहिवासी आहेत. त्यांच्या लहान बहिणीवर २०१२ साली वाघाने जोरदार हल्ला चढवला. मात्र हाली बरफ यांनी पूर्ण ताकदीने वाघाशी सामना करून आपल्या बहिणीला वाघाच्या तावडीतून सोडविले. या घटनेनंतर देशभरात हाली बरफ यांच्या धाडसी वृत्तीचे सर्वत्र कौतुक झाले होते. याबाबत त्यांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्यांना “राष्ट्रीय शौर्य पुरस्कार” देण्यात आला होता. हाली बरफ मागील काही वर्षांपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत खर्डी येथील मुलींच्या वस्ती गृहात रोजंदारीवर काम करत होती. त्याआधी शासकीय आश्रम शाळा पेंढरघोळ व शासकीय मुलींचे वस्तीगृह शहापूर येथेही सेवा बजावली होती. परंतु मागील सहा महिन्यांपासून तिच्या हाताला काम नाही. परिणामी जगण्यासाठी तिला गावागावांत मजुरी करावी लागत आहे. जंगलातील गवत कापून ते विकून जगावे लागत असल्याचे उघड झाले आहे.
शासन आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवते. आदिवासी विभागातील अनेक शासकीय पदे रिक्त आहेत. त्यापैकी एखाद्या खात्यात विशेष बाब म्हणून तिला कायमस्वरूपी नोकरी देता येऊ शकेल,असे श्रमजीवी संघटनेचे प्रकाश खोडका यांनी सांगितले. श्रमजीवी संघटना शहापूर तालुक्याच्या वतीने या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर प्रभारी प्रकल्पाधिकारी दिवाकर काळपांडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. हाली बरफ हिला तातडीने शासकीय सेवेत समाविष्ट करून तिच्या शौर्याचा सन्मान करावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.