निसर्गप्रेमींचे आज निषेध आंदोलन
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील कचोरे, भोपर, नेतिवली या टेकडय़ा एकामागून एक भूमाफियांकडून बेकायदा बांधकामे करून नष्ट केल्या जात आहे. असे असताना रहिवाशांना मोकळा श्वास घेण्यासाठी जैवसंपदेचा एकमेव आधार असलेली २७ गाव हद्दीतील उंबार्ली टेकडीही घरे बांधणारी एक शासकीय संस्था, कचरा माफिया, भंगार गोदाम मालकांकडून नष्ट करण्यास सुरुवात झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या महत्त्वपूर्ण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी आठ वाजता निसर्गप्रेमी नागरिकांकडून उंबार्ली टेकडीवर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
डोंबिवली परिसरातील रहिवासी यापूर्वी सकाळ, संध्याकाळ प्रभातफेरी, शतपावली करण्यासाठी ठाकुर्लीजवळील रेल्वेच्या १२ बंगला भागातील वनराईत जात असत. रहिवाशांचा वावर वाढल्यानंतर मध्य रेल्वेने ही जागा फिरण्यासाठी प्रतिंबधित केली. त्यानंतर निसर्गप्रेमींनी भोपर टेकडीच्या भ्रमंतीकडे मोर्चा वळवला. या ठिकाणी येणारे स्थलांतरित पक्षी टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार, पक्षी अभ्यासक यांचीही गर्दी असे. मात्र, २७ गावांतील बेकायदा बांधकामांना जागा अपुरी पडू लागल्यानंतर भूमाफियांनी भोपर टेकडीला पोखरण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी चाळी व बेकायदा इमारती उभारण्यात आल्या. त्याचप्रमाणे कचोरे, नेतिवली या टेकडय़ांवरही अतिक्रमणे वाढू लागली. यातून आतापर्यंत सुरक्षित राहिलेली उंबार्ली टेकडी आता शासकीय प्राधिकरणाचीच शिकार ठरू लागली आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या कंत्राटदाराकडून उंबार्ली टेकडी नष्ट करण्याचा प्रकार सुरू असून त्यासाठी जेसीबी, पोकलेन, सुरुंग यांचा वापर केला जात आहे.
अंबरनाथ, बदलापूर येथील काही कंपनी मालक टाकाऊ माल उंबार्ली टेकडीवर स्थानिकांना हाताशी धरून आणून टाकतात. रात्रीच्या वेळेत आग लावून हा घातक कचरा-माल जाळून टाकला जातो. त्यामुळे प्रदूषण होतेच, शिवाय या भागात निवास करीत असलेल्या पक्ष्यांना मोठा धोका या प्रदूषणापासून निर्माण होत आहे. या भागातील जंगलाला आगी लावून झाडे जाळणे, प्राण्यांना गवत-झाडपाला मिळणार नाही असा विचार करून भर दुपारी आगी लावल्या जातात. गवताला लागलेली आग इंधन पेटल्यासारखी भडकत असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण आणता येत नाही, असे निसर्गप्रेमी मंगेश कोयंडे यांनी सांगितले.
‘चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न’
उंबार्ली टेकडीवर खोदकाम करत असलेल्या म्हाडाची कंत्राटदार कंपनी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक मनोहर देवकर यांनी उंबार्ली टेकडीबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचा खुलासा केला आहे. ‘उंबार्ली टेकडीजवळ भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी करून सरकारी जमिनीचा (गायरान) भाग फक्त गृहप्रकल्पासाठी म्हाडाने ताब्यात घेतला आहे. उर्वरित भागात वन जमीन आहे. सरकारी जमिनीत गृह उभारणीचे काम म्हाडा अंगीकृत बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे केले जात आहे. गृह उभारणीनंतर म्हाडातर्फे या भागातील वन जमिनीत हरितपट्टा विकसित केला जाणार आहे,’ असे ते म्हणाले.
म्हाडाने या भागात सुरू केलेल्या गृहप्रकल्पाला निसर्गप्रेमींचा विरोध नाही. फक्त टेकडीचा मुख्य भाग आणि परिसराचे उत्खनन म्हाडाने करू नये. एवढेच निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे. तशी विनंती म्हाडाच्या अधिकाऱ्यांना वारंवार केली. याउलट त्यांनी म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या भागातील कामाचा वेग दुपटीने वाढविला आणि टेकडीचे उत्खनन वेगाने सुरू केले आहे.
मंगेश कोयंडे, निसर्गप्रेमी
आरे जंगल वाचविण्यासाठी जसे पर्यावरणप्रेमींनी मागील अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू केले आहे त्याच धर्तीवर उंबार्ली टेकडी वाचविण्यासाठी निसर्गप्रेमी नागरिकांचे आंदोलन याठिकाणी सुरू राहणार आहे. ४० हजारांहून अधिक रोपांची लागवड याठिकाणी निसर्गप्रेमी, जागरूक रहिवासी, वन विभागाकडून उंबार्ली टेकडीवर करण्यात आली आहे.
राजेश कदम, आंदोलक