कल्याण – कल्याण पूर्व तिसगाव, पुना लिंक रस्ता भागात नवरात्रोत्सवानिमित्त काही राजकीय मंडळी, नवरात्रोत्सव संस्थांनी भक्तांचे स्वागत करण्यासाठी रस्तोरस्ती कमानी लावल्या आहेत. या कमानींमुळे वाहतुकीला अडसर, तर काही ठिकाणी पालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेरे कमानींमुळे झाकोळले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

कल्याण पूर्व भागात नेहमीच वाहन वर्दळीने गजबजलेला असतो. या भागातून नेवाळी मलंगगड बदलापूर, उल्हासनगर शहराकडे जाणारी वाहने धावत असतात. त्यामुळे कल्याण पूर्व भागात नेहमीच वाहन कोंडी होत असते. अशा परिस्थितीत मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर नवरात्रोत्सवानिमित्त स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. या स्वागत कमानींमुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा, वाहने वळणाला अडथळा येण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.

पालिकेने अशा भव्य कमानींना परवानगी देताना वाहतुकीचा विचार करण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशाच पध्दतीने डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण पश्चिमेत रस्तोरस्ती नवरात्रोत्सव ते दिवाळी दरम्यान कमानी लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या कमानी, फलक अद्याप उतरले नसताना आता नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त उत्सवांच्या ठिकाणी गरबा खेळले जातात. काही रस्ते बंद केले जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बदल करून वाहन चालकांना इच्छित स्थळी जावे लागते. हा त्रास कायम असताना आता कमानींचे अडथळे सुरू झाल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

कल्याण पूर्वेत कमानींचे सांंगाडे तिसगाव परिसरात उभारण्यात आले आहेत. या सांगाड्यांवर जेव्हा जाहिरातीचे फलक लागतील त्यावेळी मात्र पालिकेचे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावलेले कॅमेरे काही ठिकाणी झाकोळण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. शहरातील गुन्हेगारी, गैरप्रकार रोखण्यासाठी पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे हे कॅमेरे कोठेही कमानी, फलक यांच्यामुळे झाकोळणार नाहीत याची काळजी घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मालमत्ता विभागात आवश्यक शुल्क भरून कल्याण पूर्व भागात काही संस्था, व्यक्तिंनी शुभेच्छा कमानी उभारल्या आहेत. या कमानींमुळे कोठेही वाहतुकीला अडथळा होणार नाही. पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे झाकोळले जाणार नाहीत याविषयीची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. एके ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा झाकोळल्याची तक्रार होती. त्या तक्रारीची सोडवणूक करण्यात आली आहे. उमेश यमगर साहाय्यक आयुक्त, ड प्रभाग.