ठाणे : मुंब्रा येथील विविध समस्यांची सोडवणूक करण्यात ठाणे महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा – कौसा भागातील कचरा उचलला जात नाही. यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. कचरा दुर्गंधीने नागरिक हैराण झाले असून नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. यामुळे पालिका मुख्यालयात सुरक्षारक्षकांची धावपळ झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुंब्य्रातील माजी नगरसेवक आणि पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांच्यासह माजी नगरसेवक सिराज डोंगरे, सुधीर भगत, फरजाना शाकीर शेख, सुनिता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाला, जमिला नासिर खान, कमरूल हुद्दा, नादीरा सुर्मे, शाकीर शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंब्रा, कौसा येथील कचरा समस्या आता उग्र रूप धारण करू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. कचराभूमीची व्यवस्था करण्यात ठाणे पालिकेला यश आलेले नाही. मुंब्रा येथील कचरा उचलला जात नाही. शहरातील कचरा उचलावा, यासाठी अनेकवेळा संबधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शानू पठाण यांच्यासह माजी नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात सोमवारी धडक दिली. या सर्वांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर “हेच आहे स्वच्छ भारत अभियान?” असे बॅनर झळकवित ठिय्या आंदोलन करून कचरा तत्काळ उचलण्याची मागणी केली.
मुंब्रा – कौसा भागात सध्या कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. अनेकवेळा तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्यामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याने माजी नगरसेवकांनी सांगितले. आज रस्त्याच्या कडेलाच नव्हे तर सर्व आरोग्य केंद्रांच्याबाहेरही कचरा जमा झाला आहे. रोगराई वाढल्याने रुग्णालये हाऊसफुल्ल झालेली आहेत, असा दावा माजी नगरसेवकांनी केला. कचरा उचलला जात नसतानाही क्रिस्टल कंपनीला कोट्यवधी रूपये दिले जात आहेत. म्हणजेच या समस्येला ठाणे महापालिकाच जबाबदार आहे. तसेच आम्हाला मोठे प्रकल्प नकोत, कचरा आणि पाणीसह आरोग्य सुविधा द्या, असे पठाण यांनी सांगितले.
