कधी काळी मागास म्हणून ओळखला जात असलेला कळवा-मुंब्रा मतदारसंघ आता कित्येक पटीने सुधारुन विकास कामांमध्ये पुढे गेला आहे. डोंबिवलीपेक्षा हे मतदारसंघ लाख पटीने बरे आहेत, अशी खोचक टीका भाजपाचे डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा नामोल्लेख टाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- डोंबिवलीतील माणकोली पूल पुढील वर्षी एप्रिलमध्ये खुला; पर्यायी रस्त्यांची उभारणी केली नाही तर डोंबिवलीत वाहनकोंडी

डोंबिवलीत रस्ते, खड्डे, कचरा, कोंडी अशा अनेक समस्या असताना इथला सुशिक्षित, सुसंस्कृत मतदार खूप शांत आहे. खरोखर इथल्या मतदारांच्या सहनशीलतेला सलाम, अशी उपरोधिक टीपणी नेते आव्हाड यांनी डोंबिवलीतील मतदारांवर केली. डोंबिवली जवळील भोपर गावातील एका केबल चालकाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल आरोपींमध्ये भाजपाचा भोपर गावातील पदाधिकारी संदीप माळी हा एक क्रमांकाचा आरोपी आहे. दोन दिवसापूर्वीच भाजप पदाधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माळी यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. पंधरा दिवस उलटूनही केबल चालकाच्या आत्महत्येला जबाबदार आरोपींवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डोंबिवलीत इंदिरा चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, माजी मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड, प्रदेश नेते आनंद परांजपे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महेश तपासे, काँग्रेसचे संतोष केणे, वंडार पाटील उपस्थित होते.

हेही वाचा- उल्हासनगर : शहाड पुलावरची कोंडी फुटणार ; एमएमआरडीएकडून पुलाच्या विस्तारीकरणाला तत्वतः मंजूरी

राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर किरकोळ गुन्हे दाखल असले की पोलीस त्याला तात्काळ तडीपारीची नोटीस बजावतात. त्याच्या कुटुंबीयांचा छळ करतात. डोंबिवलीत भोपर येथील भाजप पदाधिकारी संदीप माळी याच्यावर २३ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, दहशत माजविणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. एवढा सराईत गु्न्हेगार असुन संदीप माळीवर पोलीस कारवाई करत नाहीत. तो मोकाट फिरतो. कायद्याचे राज्य शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. हिटलरने जशी स्वताची आर्मी स्थापन केली होती. तसाच प्रकार आता ठाण्यात सुरू झाला असून पोलिसांच्या माध्यमातून राजकीय दहशत पसरवली जात आहे, असा आरोप आव्हाड यांनी सध्या राजकीय मंडळींवर सुरू असलेल्या कारवाईचा हवाला देऊन केली.

हेही वाचा- डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान विश्वस्तपदासाठी रविवारी निवडणूक; चार नवीन चेहऱ्यांना संधी

सुशिक्षित, शैक्षणिक क्षेत्रात डोंबिवलीचा लौकिक आहे. अनेक दिग्गज या शहरात घडले, वाढले. विद्येचे माहेरघर, सुशिक्षितांची नगरी, उच्चविद्याभुषितांची नगरी अशी भूषणे असलेल्या डोंबिवलीची आताची वाताहत पाहून येथील मतदारांच्या भूमिकेबद्दल आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हाध्यक्ष आप्पा शिंदे यांनी भोपर गाव परिसर संदीप माळीच्या दहशतीखाली आहे. तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा असताना त्याच्यावर कारवाई का केली जात नाही. येत्या काही दिवसात संदीप माळीला अटक करण्यात आली नाही तर डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस, नागरिकांचे मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. कोणी फलक लावला म्हणून लगेच राष्ट्रवादी दसऱ्या मेळाव्याशी संबंध जोडणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awad criticism bjp mla ravimdra chavan dpj
First published on: 04-10-2022 at 16:47 IST