ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा बनलेले कळवा-मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (३ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरला. आव्हाड अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी सोबत केली होती. आव्हाडांचा अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित मिरवणुकीत पवार दोन तासांहून अधिक काळ सहभागी झाले होते. आव्हाड यांनी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या संपत्तीसंदर्भात माहिती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रात आव्हाड यांनी त्यांच्या आणि त्यांची पत्नी ऋता यांच्या नावे किती संपत्ती आहे याची माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार आव्हाड यांची एकूण जंगम मालमत्ता १३ कोटी ६७ लाख ९१ हजारहून अधिक आहे. तर स्थावर मालमत्ता २७ कोटी ९१ लाख ३३ हजारहून अधिक आहे. म्हणजेच आव्हाड हे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (स्थावर व जंगम मालमत्ता मिळून १६ कोटी रुपये) यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे.
आव्हाड यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये २५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम गुंतवली असल्याचे म्हटले आहे. यापैकी काही बँकांमध्ये वैयक्तिक गुंतवणूक आहे तर काही ठिकाणी भागीदारीमध्ये अथवा कंपन्यांच्या नावे गुंतवणूक करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे शेअर्स आणि एलआयसी पॉलिसीही आपल्या नावे असल्याचे आव्हाड यांनी नमूद केले आहे. तसेच आपल्या नावावर ५१ ग्राम सोने (किंमत १ लाख ८२ हजार ८८६) असून पत्नीच्या नावे २३४ ग्राम सोने (८ लाख ३९ हजार १३४) आणि ३.२ किलो चांदी (१ लाख ५५ हजार २२०) असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याशिवाय त्यांनी २०१२ मध्ये घेतलेल्या ५५ लाखांहून अधिक किंमत असणाऱ्या दोन गाड्यांचा तपशील दिला आहे. यामध्ये १० लाख ३४ हजारांची होंडा सीटी आणि ४५ लाख ३१ हजारांची बीएमडब्यू गाड्यांचा समावेश आहे.
याशिवाय आव्हाड यांनी स्थावर मालमत्तेमध्ये आपल्या नावावर ठाण्यातील येऊर, नाशिकमधील सिन्नर येथे शेतजमीन असल्याचे म्हटले आहे. तर बिगर शेती जमीनीमध्ये येऊरमध्ये बंगला, मुलुंडमध्ये गाळा आणि आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट असल्याचे म्हटले आहेत. तसेच आपल्यावर एकूण ३७ लाख ५८ हजारहून अधिक कर्ज असल्याचे आव्हाड यांनी म्हटलं आहे.
म्हणजे आव्हाड यांच्या नावे एकूण संपत्ती ही ४१ कोटींहून अधिक आहे. यामध्ये १३ कोटी ६७ लाख ९१ हजार ७४५ रुपये जंगम मालमत्ता तर २७ कोटी ५१ लाख ३३ हजार ०९१ रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. पत्नीच्या नावे ५ कोटी १८ लाख ५८ हजार ८६३ रुपये जंगम मालमत्ता तर १ कोटी ४ लाख २५ हजार रुपये स्थावर मालमत्ता आहे.
आव्हाड राष्ट्रवादीचा एकमेव चेहरा
शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ात काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तोडीस तोड ताकद निर्माण केली होती. मात्र भाजपच्या लाटेत राष्ट्रवादीतील मातब्बरांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला किसन कथोरे, कपिल पाटील यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर अगदी अलीकडे गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील पवारांची साथ सोडली. अशा वेळी जितेंद्र आव्हाड हा पक्षाचा एकमेव मोठा चेहरा उरला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या उमेदवारी अर्ज मिरवणुकीच्या माध्यमातून पवार यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा आणि गर्दी यामुळे मुंब्य्रातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी झाली होती.