ठाणे : कौसा येथील देवरीपाडा कॅम्पसमध्ये तब्बल ४८ तास वीज गेल्याने एका वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने टोरंट कंपनीच्या कार्यालयला टाळे लावले. नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर उग्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाला यावेळी दिला.
हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान; ठाकरे गटाच्या राजुल पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभाध्यक्ष शमीम खान यांनी हे आंदोलन केले. शमीम खान यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह भारत गियर येथील टोरंट कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच या कार्यालयास टाळे ठोकले. यावेळेस कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना ओळखून टोरंटचे जगदीश चेलरामानी यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जात आश्वासने दिली. थकीत बिलावरील व्याज रद्द करणार, नोटीस दिल्यानंतरच वीजचोरीचा गुन्हा दाखल करणार, प्रभागनिहाय अधिकारी नियुक्त करणार, देवरीपाडा येथील विजसमस्या निकाली काढणार, नवीन जोडणीसाठी २५०० ऐवजी ५०० रूपये आकारणार, नागरिकांशी अरेरावीने वागणारे समीर पठाण यांची बदली करणार अशी आश्वासने चेलरामानी यांनी दिली. त्यानंतर कार्यालयाला लावलेले टाळे काढण्यात आले.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये घराच्या आगीत महिला गंभीर जखमी
गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा, कौसा भागात वीजेचा लपंडाव सुरू आहे. देवरीपाडा येथे सुमारे ४८ तास वीज नसल्याने रुग्णालयातील रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. त्यातच मागील आठवड्यात डायलेसीस सुरू असलेल्या एका वृद्धेला विजेअभावी उपचार न झाल्याने जीव गमवावा लागला, असा आरोप खान यांनी केला. यापुढे जर टोरंटच्या अधिकाऱ्यांकडून गैरवर्तन झाले. नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तर उग्र आंदोलन उभारण्यात येईल. आज लावलेले टाळे काढले असले तरी भावी काळात पुन्हा टाळे ठोकू, असा इशारा खान यांनी यावेळी दिला