स्थानिक निवडणूक एकत्र लढण्याबाबत राष्ट्रवादीचा ठराव
ठाणे : मिळेल त्या मुद्दय़ावर एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग असलेल्या ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी मात्र संयमाचा सूर आळवत महाविकास आघाडीच्या आणाभाका घेतल्या. शिवसेनेकडून कितीही टीका झाली तरी त्याला या टीकेला आता प्रतिउत्तर देणार नाही अशी भूमिका जाहीर करत संपूर्ण जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करावी अशा स्वरूपाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांच्या एका बैठकीत मंजूर करण्यात आला.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाणे जिल्ह्यातही आघाडी करण्यात कोणतीही अडचण नाही, अशी भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली. त्यामुळे या दोन्ही पक्षातील तणाव काही प्रमाणात निवळल्याचे दिसून आले.
ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात गेल्या काही दिवसांपासून टोकाचे टीकास्त्र सुरू झाले आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी तर आघाडी नकोच अशी जाहीर भूमिका घेत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना थेट लक्ष्य केले होते.
प्रभागांचे आरक्षण करताना आव्हाडांच्या हस्तक्षेपामुळे मुंब्रा परिसरावर मेहरनजर तर ठाण्यावर अन्याय करण्यात आल्याची टीकाही म्हस्के यांनी केली होती. तर निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा क्लस्टरचे गाजर असे फलक लावत राष्ट्रवादीने थेट पालकमंत्र्यांना डिवचल्याची चर्चा रंगली होती. ठाण्यात या दोन पक्षात हा वाद रंगला असला तरी जिल्ह्यातील इतर शहरांमधील पदाधिकारी मात्र या वादामुळे संभ्रमात पडले असून नवी मुंबईतील शिवसेनेच्या काही नेत्यांनी आघाडी व्हावी यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दारे ठोठविल्याची चर्चाही रंगली आहे.
या पार्श्व भूमीवर शनिवारी जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडी करण्याची भूमिका जाहीर करताच त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद निवळण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र पुढे आले आहे.
पालकमंत्र्यांचीही सावध भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील पक्षाच्या सर्वच शहराध्यक्षांची एक बैठक शनिवारी ठाण्यात बोलावली होती. या बैठकीत शहराध्यक्षांनी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली शिवाय तसा ठरावही संमत केला.
प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप आहे. राज्य, जिल्हा आणि शहरात भाजप वाढू द्यायचा नसेल तर महाविकास आघाडी आवश्यक आहे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे. त्यासाठीच सर्व जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडी करण्याबाबत आपले मत नोंदविले आहे, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये. तसेच समोरून जरी कोणी बोलले तरी त्याला प्रत्युत्तर द्यायचे नाही, असे आमचे ठरले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आघाडीस अडचण नाही – शिंदे
पालकमंत्री शिंदे यांनीही आघाडी करण्यास अडचण नाही, अशी भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.
अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात पालिका निवडणुका आघाडीत लढविण्यास काहीच अडचण नाही. आम्ही कुणावरही टीका करत नाही. पण, समोरून टीका झाली तर त्याला प्रतिउत्तर दिले जाते. त्यामुळे सर्वानी सांभाळून बोलावे. आघाडी करायची असेल तर दोन्ही पक्षातील नेत्यांना सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.