व्हाट्सअप संदेशांवरून झालेल्या वादातून उल्हासनगर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते गुरूवारी रात्री समोरासमोर आले. रिपाइंच्या दोन कार्यकर्त्यांनी थेट माजी आमदार पप्पू कलानी यांचे निवासस्थान असलेल्या कलानी महल येथे प्रवेश करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दिलेल्या तक्रारीवरून परस्परांविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाण्यात प्राण्यांकरीता रुग्णालयासह स्माशानभुमीच्या उभारणीसाठी हालचाली; पालिका प्रशासनाकडून पडले गावातील कोंडवाड्याच्या जागेचा विचार

उल्हासनगर शहरातील राजकारण गेल्या काही दिवसात तापू लागले आहे. प्रभार रचनेचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शहरातील इच्छुकांनी तयारीला सुरूवात केली होती. त्यात मध्यंतरीच्या काळात खंड पडला मात्र स्थानिक पातळीवर काम सुरूच होते. याचे पडसाद अनेकदा समाज माध्यमांवर पहायला मिळत होते. गुरूवारी असाच काहीसा प्रकार उल्हासनगरात समोर आला. शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा, माजी नगरसेवकांचा भरणा असलेल्या एका व्हाट्सअप समुहावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करणारा संदेश रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी टाकला. त्यावरून दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली. यात खुद्द रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी उडी घेतली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत पुस्तक आदान-प्रदान सोहळ्याचे जानेवारीत आयोजन; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोहळ्याचा श्रीगणेशा

यात काही वेळाने एकमेकांच्या खासगी आयुष्याबाबत टिपण्णी करण्यात आली. त्यावरून झालेल्या वादानंतर रिपाइंच्या भगवान भालेराव यांचा नातेवाईक आणि कार्यकर्ते असे दोघे थेट कलानी महल येथे शिरले. येथे त्यांनी कमलेश निकम यांच्यावर थेट हल्ला केला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना मारहाण केली. या प्रकारानंतर कलानी महल परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमू लागले. तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे कळताच पोलिसांनी कलानी महल आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला. याप्रकरणी दोन्ही गटाकडून दाखल झालेल्या तक्रारीनंतर दोन्ही गटांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. मात्र या प्रकारानंतर शहरातील राजकारण तापू लागले आहे.

समाजमाध्यमावरून यापूर्वीही तणाव

उल्हासनगर शहरात समाजमाध्यमावर केल्या गेलेल्या टिकेनंतर झालेल्या वादाच्या घटना यापूर्वीही समोर आल्या होत्या. एकदा भाजप नगरसेवकाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांन मारहाण केली होती. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नगरसेवकाला तोंडाला काळे फासले होते. त्यामुळे समाज माध्यमांवरील समुह राजकीय आखाडा झाल्याचे चित्र आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp rpi activists clash over dispute on whatsapp messages zws
First published on: 25-11-2022 at 18:18 IST