भाजप प्रवेशाची चाचपणी
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा ज्येष्ठ नगरसेवकांच्या अटकेचे राजकीय पडसाद आता उमटू लागले असून, पक्षनेत्यांकडून या प्रकरणी साधी विचारपूसही होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या तब्बल १५ नगरसेवकांनी सोमवारी येऊर येथे ‘गुप्त’ बैठक घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी देण्यासंबंधीची खलबते केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. परमारप्रकरणी हनुमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक अटकेत आहेत. येऊर येथील बैठकीत या दोघांचे समर्थक नगरसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमधील प्रवेशाची चाचपणीही या नगरसेवकांकडून करण्यात आल्याचे समजते.
सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जगदाळे, मुल्ला यांच्यासह विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण अशा चौघा नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख केला होता. याआधारे पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या नगरसेवकांच्या अटकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते कमालीचे मवाळ झाले असून, महापालिका निवडणुका तोंडावर असताना नेत्यांची ही भूमिका पक्षाला मारक असल्याची भीती आता दोन्ही पक्षांतील नगरसेवक व्यक्त करूलागले आहेत. मुल्ला आणि जगदाळे यांची साधी विचारपूसही वरिष्ठांकडून होत नसेल तर अशा पक्षात कशासाठी राहायचे, अशी भूमिका मांडत या वेळी काही नगरसेवकांनी टोकाचे मतप्रदर्शन केल्याचे बोलले जाते. दरम्यान, मुंबई आणि ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक भाजपने शिवसेनेसोबत फारकत घेऊन लढायचे ठरविल्यास भाजपप्रवेशाचा विचारही राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी या बैठकीत बोलून दाखविला. भाजपकडून आवतण आल्यास ते स्वीकारण्यासंबंधी विचार होऊ शकतो, असे मत या बैठकीस उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नगरसेवकाने व्यक्त केले. जगदाळे आणि मुल्ला यांच्यासंबंधी पक्षाने घेतलेली भूमिका पाहता पक्षाचे किमान १२ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
ठाण्यात राष्ट्रवादीत फूट ? सूरज परमार प्रकरणामुळे नगरसेवकांची गुप्त बैठक
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमधील प्रवेशाची चाचपणीही या नगरसेवकांकडून करण्यात आल्याचे समजते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 12-01-2016 at 03:29 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp split in thane