जैव कृषी अभ्यासक आणि कृषिभूषण राजेंद्र भट यांचे मत
देशात तुरडाळ आणि भातशेतीबाबत नवे धोरण अवलंबण्याची गरज असून हे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस देऊन प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जैव कृषी अभ्यासक आणि कृषिभूषण राजेंद्र भट यांनी केले.
प्रतिभावंत बदलापूरकर या उपक्रमात पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधत जैव कृषी अभ्यासक आणि कृषिभूषण राजेंद्र भट यांची मुलाखत उदय कोतवाल यांनी घेतली. काका गोळे फाऊंडेशनच्या खुल्या रंगमंचावर पार पडलेल्या या कार्यक्रमास रसिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.
आपल्या देशात मागणीपैकी केवळ ३० टक्के तुरडाळ पिकवली जाते. आता पुढील काही काळात त्याचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरडाळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने बोनस देणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता शासन तुरडाळ आयात करते. शासनाचे हे धोरण अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भात शेती करणारा भारतीय शेतकरी तोटय़ात आहे. मात्र शेतकरी केवळ भात पिकवत नाही, तर त्या माध्यमातून जलसंधारण वाढवण्याचे कामही तो करीत असतो. त्यामुळे त्यांनाही बोनस देऊन प्रोत्साहन देणे हे शासनाचे आणि नागरिकांचेही कर्तव्य असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
पाश्चात्त्य देश आपले उत्पादन नाकारू शकतात. मात्र आपण पाश्चात्त्य देशातील वस्तू नाकारू शकत नाही. तसा कायदाच आपल्याकडे नाही. त्यामुळे तसा कायदा प्राधान्याने करणे गरजेचे आहे, असे राजेंद्र भट यांनी या वेळी सांगितले. आपल्याकडचा शुद्ध गोवंश अमेरिकेत आहे. मात्र आपल्याकडे मूळ गोवंश उपलब्ध नाही, या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांनीही बहुस्तरीय बहुपीक पद्धती अवलंबण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली. या पद्धतीमुळे जैव शेती वाढते आणि तेथेच कचरा पडून कुजतो. त्याच्यातून जिवाणू वाढून शेतीचा कस वाढतो. जैव शेतीबाबत याआधीही आपल्या पूर्वजांनी योग्य मार्गदर्शन केलेले आहे. त्यातून त्याचे महत्त्व स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले. मुळात शेती हा व्यवसाय नसून शेती करणे ही खरी आपली जीवनपद्धती असल्याचे भट यांनी सांगितले. आपला देश हा शेती प्रधान आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे आपल्या देशाचे खरे सूत्र आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. या मुलाखतीआधी राजेंद्र भट यांच्या कार्याचा परिचय करून देणारी चित्रफीत दाखवण्यात आली.