लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक बंद करून त्याठिकाणी लोखंडी संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. त्यामुळे होम फलाटाचा भाग असलेला फलाट क्रमांक एक अ हा फलाट क्रमांक एक करण्यात आला आहे. याबाबत प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर खासदार सुरेश म्हात्रे यांनी मंगळवारी बदलापूर स्थानकात भेट दिली. मात्र ही जाळी उद्वाहन आणि स्वयंचलित जीन्याच्या कामापर्यंत कायम राहील असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी ही जाळी काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी म्हात्रे यांनी बोलताना दिले. त्यामुळे तुर्तास ही फलाटावरील लोखंडी जाळी हटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याने बदलापुरातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला. गर्दी विभाजनासाठी तयार करण्यात आलेला होम फलाट अल्पजीवी ठरला. आता होम फलाटातील फलाट क्रमांक एक अ हा फलाट क्रमांक एक म्हणून वापरात आणला जातो आहे. फलाट क्रमांक दोनवर स्वयंचलीत जिना आणि उद्वाहन उभारणीसाठी जागा आवश्यक असून त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती. मात्र मुंबईसाठी सुटणाऱ्या लोकल प्रवाशांचे यामुळे हाल होत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून याबाबत प्रवाशांमधून लोकप्रतिनिधींवर टीका होत असताना मंगळवारी खासदार सुरेश म्हात्रे यांनी बदलापूर स्थानकात भेट दिली. यावेळी फलाटाची पाहणी करत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रेल्वेने अचानक घेतलेल्या या निर्णयावर संताप व्यक्त केला. या कामाची प्रवाशांना एक महिना आधी पूर्वसूचना देण्याची गरज होती. खासदार म्हणून मलाही पत्र देण्याची गरज होती. स्थानकावर फलक लावायची, तसेच उदघोषणा करण्याची गरज होती. मात्र रेल्वे प्रशासनाने तसे केले नाही, असे सांगत म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली.

दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी बदलापूर स्थानकात येतात. एक फलाट बंद केला तर दुसऱ्या फलाटावर भार वाढतो. सकाळीही गर्दी मोठी असते. एक लोकल जर उशिराने आली तर ही गर्दी दुप्पटीने वाढते. त्यामुळे लोखंडी जाळी काढावी अशी आमची मागणी आहे, असे म्हात्रे म्हणाले. तसेच रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे ती उद्वाहन आणि स्वयंचलित जीने बसवण्यासाठी दीड महिना लागणार आहे. त्यासाठी ही जाळी असावी अशी रेल्वेची भूमिका आहे. त्यामुळे सध्या सुरक्षिततेसाठी जाळी असेल. भविष्यात ती काढली जाईल. त्यासाठी मी पाठपुरावा करेन, असेही म्हात्रे यावेळी म्हणाले.

प्रवाशांची फरफट

पूर्वी फलाट क्रमांक एक आणि एक अ अशा दोन्ही फलाटांवर गर्दी विभागली जात होती. त्यामुळे प्रवाशांना चढताना त्याचा फआयदा होत होता. कर्जत, खोपोली भागात राहणारे अनेक प्रवाशी मुंबईहून बदलापूर लोकलने प्रवास करत बदलापूर स्थानकात उतरत होते. फलाट क्रमांक एकवर येऊन प्रवासी थांबत होते. त्यांना त्याच फलाटावर फलाट क्रमांक दोनवरून कर्जत, खोपोलीकडे जाणारी लोकल मिळत होती. आता फलाट क्रमांक एकवर उतरून त्यांना जीन्याने फलाट क्रमांक दोनवर यावे लागते आहे. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.