राज्य सरकारची संमती; वाहतूक कोंडीवर उतारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे, कळवा आणि विटावा यादरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा शोधण्यासाठी ठाणे खाडीवर विटावा ते कोपरीदरम्यान, चौथा खाडी पूल उभारण्यास राज्य सरकारने अखेर संमती दिली आहे. सद्य:स्थितीत ठाणे महापालिकेमार्फत तिसऱ्या खाडी पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत विटावा ते कोपरीदरम्यान पुलाची उभारणी व्हावी, असा प्रस्ताव मध्यंतरी पुढे आला होता. राज्य सरकारने मात्र या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवताना हे काम ठाणे महापालिकेमार्फतच केले जावे, असे आदेश दिले आहेत. तसेच पुलाच्या उभारणीसाठी काही तांत्रिक साहाय्य लागल्याने ते महानगर प्राधिकरणाकडून घ्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ठाणे महापालिका हद्दीचा महत्त्वाचा भाग असलेल्या कळवा, विटावा परिसराची लोकसंख्या काही लाखांच्या घरात पोहोचली असली तरी हे उपनगर नागरी सुविधांच्या आघाडीवर अजूनही मागासलेले आहे. ठाणे आणि कळवा या मार्गावर सध्या उपलब्ध असलेल्या एकमेव खाडी पुलावरून दररोज शेकडोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते. ठाणे-बेलापूर मार्ग सुस्थितीत असल्याने नवी मुंबईहून नाशिक आणि घोडबंदरच्या दिशेने जाण्याकरिता टोलचा जाच चुकवण्यासाठी शेकडो वाहनचालक विटावा-कळवा मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वर्दळ सतत वाढत असून यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेने खाडीवर तिसऱ्या पुलाची उभारणी सुरू केली आहे. खाडीवरील पहिला पूल जर्जर झाल्याने यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एकमेव पुलावरून वाहतूक सुरू असली तरी वर्षअखेरीस तिसरा खाडीपूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा दावा महापालिकेचे अभियंते करत आहेत.

कळवा-विटाव्यातून ठाणे रेल्वे स्थानक तसेच कोपरी, पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दिशेने ये-जा करण्यासाठी हलक्या वाहनांसाठी हा पूल उभारला जावा असा प्रस्ताव पुढे आल्याने या नव्या पुलाची बांधणी कोणी करावी यावर ठोस निर्णय होत नव्हता. खाडीवरील तिसऱ्या पुलाची बांधणी महापालिकेमार्फत केली जात असल्याने लगेच नव्या पुलाचा आर्थिक भार उचलणे महापालिकेस शक्य होईल का याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. असे असले तरी या नव्या पुलाचे काम पालिकेमार्फतच केले जावे, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव

चौथ्या खाडी पुलास मान्यता देत असताना राज्य सरकारने कळवा चौक ते खारेगावपर्यंत रस्ता रुंदीकरण आणि सेवा रस्त्याच्या बांधणीसही मंजुरी दिली आहे. कळव्याचे रस्ते अरुंद असल्याने या ठिकाणी प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हे काम महापालिकेनेच करावे, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New flyover in thane
First published on: 20-04-2018 at 00:18 IST