आठ महिन्यांत पूर्ण करणार असल्याची रेल्वे प्रशासनाची ग्वाही;कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावरही स्वच्छतागृह
मध्य रेल्वेच्या कोपर, कल्याण, शहाड, आसनगाव, खर्डी आणि कसारा या सहा रेल्वे स्थानकांत नवी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. या सहा स्वच्छतागृहांसाठी २ कोटी ३६ लाख ९१ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नुकतेच या स्वच्छतागृहांच्या उभारणीचे कंत्राट ठेकेदाराला देण्यात आले असून या स्वच्छतागृहांची कामे आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या रेल्वे स्थानकांत स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधा नसल्याने प्रवाशांची विशेषत: महिला प्रवाशांची कुचंबणा होत होती. ती लवकरच टळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून कल्याणपल्याड असलेल्या शहाड, आसनगाव, खर्डी आणि कसारा या ठिकाणी स्वस्त दरात घरे उपलब्ध असल्याने या भागांचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या ठिकाणी पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्याने या ठिकाणचे नागरिक उपनगरीय लोकल सेवेवर अवलंबून आहेत. या ठिकाणाहून अर्धा तासाच्या अवधीनंतर मुंबई दिशेकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल धावतात. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गाडीची वाट पाहण्यासाठी स्थानकात थांबावे लागते. स्थानकांमध्ये स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. अनेकदा प्रवासी रेल्वे रुळांलगत नैसर्गिक विधी उरकतात. त्यामुळे अस्वच्छता व दरुगधीही पसरते. दिवा-वसई मार्गावर असलेल्या कोपर रेल्वे स्थानकात (अप्पर) तर गेली अनेक वर्षे स्वच्छतागृहच नाही. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकातील एकमेव स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो.
पादचारी पुलावरील पहिले स्वच्छतागृह
कल्याण जंक्शन येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून स्थानकातील स्वच्छतागृहे अपुरी पडत असल्याने नव्याने स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी प्रवासी करत आहेत. याच कारणाने कल्याण पूर्वेकडे कोळसेवाडी भागात जाणाऱ्या पादचारी पुलावर स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पादचारी पुलावर उभारण्यात येणारे हे पहिलेच स्वच्छतागृह असणार आहे.
शहाड, आसनगाव, खर्डी, कसारा स्थानकांत एकच स्वच्छतागृह असून या स्थानकात प्रवासी वाढल्याने स्वच्छतागृहे अपुरी पडतात. त्यामुळे या ठिकाणी नवी स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे.- राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवर नवी स्वच्छतागृहे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कामे लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.– अनिल कुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे