बदलापूरः मुरबाड आणि शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नीलगायींचा वावर गेल्या काही वर्षात दिसून आला आहे. अशीच एक नीलगाय मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील एका कठडा नसलेल्या विहिरीत पडली. सुदैवाने याची माहिती वन विभागाला लवकर मिळाली. त्याचवेळी शेजारच्याच शिवळे येथील महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू होते. त्यामुळे या प्रशिक्षणार्थींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या नीलगायीची सुटका केली. त्यामुळे नीलगायीला जीवदान मिळाले. शिवळे गावाजवळील एका विहिरीत बुधवारी सकाळच्या सुमारास एक नीलगाय पडल्याची माहिती मिळाली. त्याची माहिती मिळताच स्थानिक वनक्षेत्रपाल दर्शना पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा >>> पाच हजार किमीचे अंतर पार करून दक्षिण आफ्रिकेतील ‘रणगोजा’ पाहुणा डोंबिवलीत

गेल्या काही दिवसांपासून शिवळे येथील जनसेवा शिक्षण महामंडळाच्या शांतारामभाऊ घोलप महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे आपदा मित्रचे प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण सुरू होते. तितेथ गिर्यारोहक नंदू विशे, प्रकाश भुसारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अिता जवंजाळ याही उपस्थित होत्या. नीलगायीच्या सुटकेसाठी आवश्यक असणारे दोरखंड आणि इतर साहित्य उपलब्ध असल्याने तातडीने बचावकार्य सुरू झाले. आपत्तीकाळात कशा पद्धतीने मदत कार्य करता येईल याचा प्रत्यक्ष अनुभव या प्रशिक्षणार्थींना घेता येणार होता. या प्रशिक्षणार्थींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या नीलगायीच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले. त्यातील काही जण पाण्यात उतरून त्यांनी नीलगायीला बांधले. नीलगायीचे डोळे बंद करण्यात आले. त्यानंतर सुखरूप नीलगायीला बाहेर काढण्यात आले. पाण्यात पडल्याने नीलगायीला खरचटले होते. त्यानंतर तीच्यावर प्राथमिक उपचार करून तीला जंगलात सोडण्यात आल्याची माहिती मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे.