डोंबिवली – डोंबिवली जवळील शीळफाटा रस्त्यावरील निळजे गाव ते पलाव वसाहतीत जाण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने निळजे ग्रामस्थांशी चर्चा न करता परस्पर ग्रामस्थांच्या सोयासाठी रस्ते मार्गासाठी बोगदा बांधून दिला. मुसळधार पावसामुळे या बोगद्यात पाच फूट पाणी साचल्याने निळजे ग्रामस्थांचा पलावा वसाहतीत जाण्याचा मार्ग मंगळवारी सकाळपासून बंद झाला आहे.
निळजे रेल्वे बोगद्यातून निळजे ग्रामस्थ किंवा पलावा परिसरातील नागरिक या बोगद्यातून येतात. यापूर्वी थोडा पाऊस पडला तरी या बोगद्यात गुडघाभर पाणी साचते. रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बोगदा आणि त्याचा परिसर जलमय झाला आहे. निळजे गावाजवळील रेल्वे फाटक बंंद केल्यानंतर रेल्वेने ग्रामस्थांच्या प्रवासाठी या बोगद्याची उभारणी करून दिली आहे. बोगदा उभारण्याची जमीन खोलगट आहे. याठिकाणाहून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आहे. पावसाचे पाणी याच भागातून वाहून जाते, अशी माहिती निळजेचे ग्रामस्थ प्रकाश पाटील आणि सहकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिली होती. त्याऐवजी बंद केलेल्या रेल्वे फाटकाखालून भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी केली होती. सुरूवातीला या मागणी विषयी रेल्वे अधिकारी सकारात्मक होते. पण नंतर त्यांची भूमिका बदलली.
रेल्वेने ग्रामस्थांना विश्वासात न घेता बांधलेला निळजे बोगदा दरवर्षी पावसात जलमय होत आहे. या बोगद्यातून शाळकरी मुले, नोकरदार, त्यांची वाहने, पलावा भागात शाळेत जाणारी मुले, त्यांची वाहने येजा करतात. बाजारपेठ करण्यासाठी ग्रामस्थ याच बोगद्याचा वापर करतात. आता बोगदा जलमय झाल्याने निळजे, पलावातील ग्रामस्थांना वळसा घेऊन प्रवास करावा लागतो. बोगद्यातील पाणी कमी झाले नाहीतर बुधवारी विद्यार्थी, पालक यांना वळसा घेऊन मुलांना शाळेत न्यावे लागणार आहे. नोकरदार वर्गाला शिळफाटा रस्त्याने वाहतूक कोंडीतून आपल्या इच्छित स्थळी जावे लागणार आहे, असे प्रकाश पाटील यांनी सांगितले.
बोगद्यात पाणी असताना एका मोटार कार चालकाने बोगद्यातून आपली कार काढण्याचा प्रयत्न केला. बोगद्याच्या मध्यावर मोटार आल्यानंंतर मोटारीच्या इंजिनमध्ये पाणी घुसले आणि मोटार बोगद्याच्या मध्यभागी बंंद पडली. इतर ग्रामस्थांच्या मदतीने बंंद मोटार बोगद्यातील पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. निळजे ग्रामस्थांचा बाजारपेठेत जाण्याचा मार्ग बोगदा जलमय झाल्यामुळे बंद झाला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आता निळजे गावात येऊन रेल्वे बोगद्याची पाहणी करून बोगद्याचा पावसाळ्यात काही उपयोग होत नाही याचा विचार करावा. आणि निळजे रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी निळजे ग्रामस्थांच्यावतीने प्रकाश पाटील यांनी केली आहे.