रेल्वे कृती समितीची प्रशासनावर नाराजी

कित्येक वर्षांपासून रखडलेला माळशेज रेल्वेचा प्रश्न टिटवाळा मार्गाच्या सर्वेक्षणाच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा अडगळीत पडला आहे.

कल्याण, अहमदनगर ही शहरे आणि त्यात येणारी अनेक दुर्लक्षित गावे रेल्वेमार्गाने जोडली जावीत यासाठी गेल्या २२ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी टिटवाळा माळशेज या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली. मात्र वर्षभरानंतरही त्यावर ठोस काही न झाल्याने माळशेज रेल्वे कृती समितीने नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण नगर रेल्वे मार्ग तयार झाला तर गेल्या कित्येक वर्षांपासून फक्त रस्तेमार्गाने जोडल्या गेलेल्या या भागाला नव्या वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. व्यापार आणि दळणवळणाची नवी साधने उपलब्ध झाल्याने शेती उत्पादनाची वाहतूक सुलभ होऊन विकासाची नवी दारे या भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उघडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी १९९६ पासून माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी आंदोलने, निवेदने आणि घोषणा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी सुरेश प्रभू यांच्याकडून कल्याणऐवजी टिटवाळा हे स्थानक जागेच्या उपलब्धतेमुळे सर्वेक्षणासाठी निवडले. तसेच माळशेजपर्यंतच्या शंभर किलोमीटरच्या या सर्वेक्षणासोबतच कोणत्या भागातून हा मार्ग जाईल याचीही चर्चा तेव्हापासून सुरू झाली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात मुरबाड येथील तहसीलदार कार्यालयाच्या लोकार्पणाप्रसंगी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गासाठी राज्य सरकारही खर्चाचा काही भाग उचलण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतरही या माळशेज रेल्वेवर ठोस काही झालेले दिसत नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन स्थानकेही निश्चित करण्यात आल्याचे संदेश समाजमाध्यमांवर फिरत होते. मात्र आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन ही माहिती प्रसारित केली जात असून यात काही ठोस नवे झालेले नसल्याचे माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीने सांगण्यात येते आहे.