ठाणे : शिवसेना- भाजप युतीचे सरकार हे सर्व घटकांना न्याय देणारे सरकार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादामुळे हे सरकार अस्तित्वात आले आहे. या सरकारमध्ये एकाही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे प्रथमच ठाण्यात आले होते. यावेळी शिंदे समर्थक शिवसैनिकांनी ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदारही उपस्थित होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या ठाणेकरांच्या त्रासात मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यामुळे भर पडली.  

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा गड असलेल्या ठाणे शहरात त्यांच्या समर्थकांना त्यांची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी शिंदे ठाण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांना मिळाली होती. त्यामुळे सकाळपासून शिंदे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली होती. टेंभीनाका येथील आनंद आश्रमास फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मुंबई आणि ठाणे शहराची सीमा असलेल्या आनंदनगर जकातनाका येथे एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सायंकाळी ५ वाजल्यापासूनच शिंदेसमर्थक जमले होते. पंरतु आनंदनगर जकात नाक्यावर मोठय़ाप्रमाणात पडलेले खड्डे आणि पावसाची मुसळधार सुरू असूनही शिंदे यांच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी मुख्य मार्गालगतच त्यांची वाहने उभी केली होती. त्यामुळे आनंदनगर जकातनाका ते कांजूरमार्गपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. शहरात मुख्यमंत्री शिंदे रात्री ९ च्या सुमारास दाखल झाले.

पाहा व्हिडीओ –

आनंदनगर येथे शुभेच्छा स्वीकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या गटातील आमदार, ठाण्यातील शिंदे समर्थक पदाधिकारी, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील शिंदेसमर्थक नगरसेवक उपस्थित होते. आज एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही आनंद झाला असेल. भाजप-शिवसेनेचे हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. या सरकारमध्ये कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. त्यानंतर ते टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे गेले. तेथेही ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी आनंद आश्रमासमोरील रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

मुख्यमंत्री भावुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळय़ाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर भर पावसातही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या समर्थक शिवसैनिकांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी शिंदे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते ठाण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी दुपारपासून त्यांचे समर्थक भरपावसात टेंभीनाका येथे उपस्थित होते. शिंदे यांचे आगमन होताच समर्थकांनी जल्लोष केला. ढोल आणि ताशांच्या तालावर समर्थकांनी ठेका धरला.

वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल

मुंबई आणि ठाणे शहराची सीमा असलेल्या आनंदनगर जकात नाका येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी सायंकाळी ५ वाजल्यापासूनच त्यांचे समर्थक जमले होते. पंरतु जकात नाक्याच्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि पावसाची मुसळधार सुरू असूनही शिंदे यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मुख्य मार्गालगतच त्यांची वाहने उभी केली होती. परिणामी, जकातनाका ते कांजूरमार्गपर्यंत वाहतूक कोंडी झाली. कोंडीमुळे नोकरदारांचे अतोनात हाल झाले.