महिनाभरातील पावसाची स्थिती चिंताजनक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन दिवसांपासून ठाणे तसेच आसपासच्या शहरी भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या असल्या तरी मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मात्र फारसा पाऊस पडलेला नाही. गेल्या काही दिवसांचा विचार करता अद्याप धरण क्षेत्रात पावसाने सरासरी १०० मिमीचा टप्पाही ओलांडलेला नाही. गेल्या दोन दिवसातही या भागात पावसाने जोर धरलेला नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

गतवर्षीचे अवर्षण अनुभवलेल्या नागरिकांना यंदाच्या पावसाची ओढ लागून राहिली आहे. असे असले तरी जून महिन्याने मध्यांतर ओलांडूनही अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांवर अतिरिक्त पाणीकपातीचे संकट घोंगावू लागले आहे. मागील दोन दिवसांपासून शहरी भागात काही प्रमाणात पाऊस बरसत आहे. रायगड, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली यासारख्या भागातही पावसाने जोर धरल्याचे चित्र काही प्रमाणात दिसत होते. असे असले तरी धरण क्षेत्रात मात्र अद्याप फारसा पाऊस झालेला नाही.

१ जूनपासून गेल्या २४ दिवसांमध्ये धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण नगण्य असून तेथे १०० मिमीचा टप्पाही ओलांडलेला नाही. भातसा धरण क्षेत्रात ५५.०० मिमी, आंध्रा धरण क्षेत्रात २१.०० मिमी, मोडकसागर धरण परिसरात ६५.८० मिमी, तानसा धरण क्षेत्रात ८.८० मिमी तर बारवी धरण क्षेत्रात ६३.०० मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेतही हे प्रमाण अत्यल्प आहे.

मोडकसागरच्या पातळीत सुधारणा

पावसाचा जोर नसल्याने कोणत्याही धरणाची पातळी फारशी वाढलेली नाही. उलट गेल्या १५ दिवसांमध्ये धरणांची पातळी अधिक कमी होऊ लागली आहे. असे असले तरी मोडकसागर धरणातील पाण्याची पातळी किंचित सुधारली आहे. २० जून रोजी इथे ८.९० टक्के पाणीसाठा होता. मात्र २४ जून रोजी त्यात वाढ होऊन ९.३७ पर्यंत वाढला आहे. ही एकमेव सकारात्मक गोष्ट दिसत असली तरी धरणे संपूर्ण भरल्याशिवाय शहरवासीयांसमोरील पाणीसंकट टळू शकणार नाही.

उल्हास नदीतील पाणीपातळी घटली

पुणे जिल्ह्य़ातील आंध्रा धरणातील पाण्याची पातळी घटू लागल्याने या धरणातून उल्हास नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याची पातळी घटू लागली आहे. आंध्रा धरणाने तळ गाठला असून केवळ ५.८९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धरणक्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. गेल्या २४ तासामध्ये इथे पाऊसच पडलेला नाही. मागील २२ दिवसांचा विचार केला तर या धरणक्षेत्रात जेमतेम २१ मिमी इतका नाममात्र पाऊस पडला आहे. त्यामुळे उल्हास नदीची पातळी रोडावू लागली आहे. याचा थेट परिणाम ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांच्या पाणीपुरवठय़ावर होण्याची भीती आहे. उल्हास नदीमधून कल्याण-डोंबिवली महापालिका, स्टेम प्राधिकरण पाणी उचलत असून त्यांच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No rain in dam sector
First published on: 25-06-2016 at 03:31 IST