उत्तर भारतीय मतदारांना खूश करण्यासाठी शक्कल
परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या ‘राज’कारणाचा पाया मजबूत करू पाहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवा परिसरातील उत्तर भारतीय मतदारांना खूश करण्यासाठी त्यांना नुकतीच नाशिकची सैर घडवली. नाशिकचा विकास दाखविण्यासाठी मनसेने गेल्या रविवारी ठाणे, कळवा, दिवा परिसरातील मतदारांसाठी सहलीचे आयोजन केले होते. या सहलीमध्ये उत्तर भारतीयांची खास बडदास्त ठेवण्यात आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
ठाणे महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेत दिवा परिसरातून ११ नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण पट्टय़ाचे राजकीय महत्त्व वाढले आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत दिव्यातून मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले होते. हा संपूर्ण पट्टा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोडतो. येथे मनसेचे राजू पाटील आणि त्यांचे बंधू रमेश यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ठाण्याच्या तुलनेत दिव्यात मनसेचे प्राबल्य आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले आणि दिव्यातील राजकीय गणितेही बदलली. येथील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील आणि श्रीमती मुंडे यांनी काळाची पावले ओळखत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दिव्यात मनसेमुक्तीचे वारे वाहू लागले. हा परिसर डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांच्या परिसरातच मोडतो. त्यामुळे दिव्यात राजकीय अस्तित्व राखणे हे मनसे नेते राजू पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यातूनच मनसेच्या नेत्यांनी दिव्यात वेगवेगळी आंदोलने सुरू केली. मतदारांना खूश करण्यासाठी थेट नाशिक सहलीचे आयोजन करण्यात आले आणि त्यातही उत्तर भारतीयांना पायघडय़ा घलण्यात आल्या, हे पाहून मराठी मतदार मात्र अवाक झाले आहेत.
उत्तर भारतीयांचा वरचष्मा
दिवा परिसरात कोकणवासीयांसोबत उत्तर भारतीय रहिवाशांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यांची मते ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याने सेना भाजपपाठोपाठ मनसेनेही येथे आपले लक्ष केंद्रित केले आहे. येथील बेकायदा बांधकामांमध्ये राहणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. या बांधकामांचे आश्रयदाते असलेल्या नेत्यांच्या पारडय़ात ही मते पडतात असा आजवरचा अनुभव आहे. हे लक्षात घेऊन मनसेने आयोजित केलेल्या नाशिक सहलींमध्ये उत्तर भारतीय मतदारांसाठी खास वाहन व्यवस्था ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. नाशिकचा विकास पाहता यावा तसेच मतदारांना निवडणूकपूर्व सहल घडावी, असा उद्देश यामागे ठेवण्यात आला होता. ठाणे महापालिका क्षेत्रातून तब्बल २८ बस नाशिकच्या दिशेने सोडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दिव्यातील तीन बसेस होत्या.
महाराष्ट्रावर प्रेम करणारी, मराठी भाषा जाणू शकणारी व बोलू शकणारी प्रत्येक व्यक्ती आमची आहे आणि असे लोक आमच्याकडे येत असतील तर त्यात वाईट काही नाही. आम्ही उत्तर भारतीयांच्या प्रेमात पडलो आहोत, असे नाही. निवडणुका आहेत म्हणून मतांसाठी आम्ही आमची तत्त्वे बदलणार नाही.
– अविनाश जाधव, मनसे ठाणे शहर अध्यक्ष