चिकन तसेच मटणाकडे ग्राहकांची पाठ

ठाणे : करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर लागू केलेली संचारबंदी आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास यामुळे ३१ डिसेंबरच्या पाटर्य़ावर र्निबध आल्याने यंदा साधेपणाने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. परिणामी पाटर्य़ाची संख्या कमी झाली तसेच संचारबंदीमुळे हॉटेलही लवकर बंद झाली. यामुळे चिकन विक्री केवळ १५ ते २० टक्के, तर मटण विक्री १० टक्केच झाली.

दरवर्षी नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरला पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येते; परंतु यंदा करोनाच्या पाश्र्वभूमीवर अशा पाटर्य़ावर र्निबध आले होते. शहरात ११ वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी घरातच राहून नववर्षांचे स्वागत करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यंदा पाटर्य़ाच्या आयोजनाची संख्या रोडावल्याचे चित्र होते. ठाणे शहरातील येऊर, उपवन या ठिकाणीही पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. परंतु त्याचेही प्रमाण यंदा घटले होते. त्यातच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास आला. त्यामुळे शहरातील पाटर्य़ाची संख्या कमी झाली. याचा चिकन आणि मटण व्यवसायावर परिणाम झाला. यंदा शहरात केवळ १५ ते २० टक्के चिकनची विक्री झाली असल्याचे चिकन विक्रेते चंद्रशेखर तरडे यांनी सांगितले.  थंडीच्या कालावधीत मटण खाण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र संचारबंदी आणि मार्गशीर्ष महिना यामुळे मटणाची केवळ १० टक्केच विक्री झाल्याचे मटण विक्रेते उपेश कोथमिरे यांनी सांगितले.