कल्याण – कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांंपासून दुचाकी, रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते. अशाच एका दुचाकी चोरीचा शोध घेत असताना कोळसेवाडी पोलिसांनी कल्याणमधील काटेमानिवली भागात राहत असलेल्या पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत चोरट्याला लोकग्राम भागातून अटक करण्यात आली आहे.
पियुष मधुकर जाधव (२०) असे या चोरट्याचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील ममता नर्सिंग होम शेजारील अमुल निवासमध्ये राहतो. या चोरट्याकडून त्याने लोकग्राम भागातून चोरलेली एक टीव्हीएस सुझुकीची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या वाहनाची किंमत ८० हजार रूपये आहे.
कल्याण पूर्वेत मागील पाच ते सहा महिन्यात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर, इमारतीच्या आवारात उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी, रिक्षा चोरण्याचे प्रमाण वाढले होते. या प्रकारात रिक्षा चालकांची रिक्षा चोरीला गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत होता. दिवसा, रात्री या दुचाकी चोरल्या जात होत्या. एका ठराविक चोरटाच या दुचाकी चोरत असल्याचा पोलिसांना संशय होता.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कोळसेवाडी पोलिसांना वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्याचे आदेश दिले होते. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी यासाठी एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाने गुप्त माहितीदारांकडून माहिती काढली. त्यावेळी त्यांना कल्याण पूर्व काटेमानिवली भागात राहणाऱ्या पियुष जाधव या इसमाचे नाव कळले. पोलिसांनी या इसमाची माहिती जमा केली. तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील, हवालदार मिलिंद बोरसे, राजेश कापडी, भागवत सौंदाणे, भगवान सांगळे, विलास जरग, नरेश दळवी, दिलीप सोनावळे, प्रदीप गिते यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.
दुचाकी चोऱ्या
भिवंडी टेमघर भागात राहणाऱ्या मोहम्मद हुसैन यांची दुचाकी कल्याण पूर्वेतील विशाल पावशे यांच्या बंगल्याच्या बाजुला सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उभी करून ठेवण्यात आली होती. मंगळवारी रात्रीच्या वेळेत चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. ऐशी हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याने मोहम्मद हुसैन यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. टिटवाळा येथे राहणारे संदीप पांडे यांनी त्यांची दुचाकी कल्याण रेल्वे स्थानकाजवळील सांगळेवाडी भागात सार्वजनिक रस्त्यावर उभी करून ठेवली होती. चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु्न्हा दाखल आहे.
हरिओम देवनारायण पांडे या चालकाची मोटार कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्याजवळील सीएनजी पंपाच्या बाजुला सार्वजनिक रस्त्यावर उभी करून ठेवण्यात आली होती. चोरट्याने ही मोटार शनिवारी रात्री चोरून नेली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.