ठाणे शहरापाठोपाठ आता कल्याणमध्येही ‘प्रीपेड’ रिक्षा १ जूनपासून सुरूहोत असून प्रवाशांची शेअर रिक्षाच्या जाचातून काही प्रमाणात सुटका होईल, असा विश्वास सगळ्यांना वाटत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा बेभरवशाची असल्याने नागरिकांसमोर रिक्षाशिवाय पर्याय नाही, हे रिक्षाचालकांनी ओळखल्याने त्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी मुजोरी, भाडेवाढीसाठी आंदोलन पुकारून नागरिकांना वेठीस धरणे आदी गोष्टींमुळे प्रवासी या रिक्षाचालकांच्या मनमानीला पुरते वैतागलेले आहेत. अवाजवी शेअर भाडे आकारून रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या समस्येत आणखीनच वाढ केली होती. आता ‘प्रीपेड’ रिक्षामुळे प्रवाशांना त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी जाता येणार असून त्यासाठी आरटीओने दर ठरवून दिल्याने भाडेवाढीचीही समस्या उद्भवणार नाही. ‘प्रीपेड’ रिक्षा कल्याणात व्हावी म्हणून रिक्षाचालक-मालक संघटनेने २०१३ साली शासनाकडे मागणी केली होती. अखेर शासनाने त्यास मंजुरी दिली आहे.

* कल्याण-डोंबिवलीत किती रिक्षांची कमतरता जाणवते?
कल्याण-डोंबिवली शहराची लोकसंख्या १३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने २५ टक्केच रिक्षा शहरात उपलब्ध आहेत. कल्याणमध्ये ८ हजार, तर डोंबिवलीमध्ये सहा ते सात हजार रिक्षा सध्या आहेत. टिटवाळा परिसरात साडेचारशे रिक्षा आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास दोन ते अडीच हजार रिक्षा वाढणे गरजेचे असल्याचे जाणवते.

* ‘प्रीपेड’चे व्यवस्थापन कसे आहे?
रेल्वे स्थानकापासून ते शहराच्या विविध भागांतील थांबे आणि टप्पे यांतील अंतर निश्चित करून त्यानुसार भाडे ठरविण्यात येईल. परिवहन विभागाने ठरवून दिलेले हे दर असल्याने रिक्षाचालकांच्या भाडेवाढीला प्रवाशांना तोंड द्यावे लागणार नाही. सुरुवातीला कल्याण पश्चिमेत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे, त्यानंतर पूर्वेला आणि डोंबिवली भागात ही सुविधा सुरू होईल. ० ते २, ० ते ४, ० ते ६, ० ते ८, ० ते १०, ० ते १२ व ० ते १६ किलोमीटर अशा टप्प्यात हा प्रवास होणार आहे. ० ते २ किलोमीटर परिसरात दुधनाका, आग्रा रोड, लालचौकी, बेतुरकर पाडा अशा विभागांचा समावेश असेल. रेल्वे स्थानकाच्या लगतच ‘प्रीपेड’ रिक्षाचा वाहनतळ सुरू करण्यात येणार आहे. प्रवासी वाहनतळावर आला, की प्रवाशाचे अंतिम स्थान, भाडे दर याची पावती त्याला देण्यात येईल. तसेच संगणकात रिक्षाचालकाचे नाव, मोबाइल नंबर, रिक्षा नंबर याची नोंदही होणार आहे. वाहनतळावर प्रवाशाला भाडे दराची पावती दिली जाईल. ती पावती त्याने रिक्षाचालकाला दाखवायची आहे. रिक्षाचालक प्रवासी सोडून आल्यावर त्याला वाहनतळावर त्याचे भाडे देण्यात येईल. यामुळे चालक व प्रवासी यांच्यात भाडय़ावरून वाद होणार नाही.

* वाद कमी होण्यास किती मदत होईल?
‘प्रीपेड’ रिक्षामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल. रिक्षाचालकांसाठीही ही सुविधा सोयीची ठरेल. कल्याण-डोंबिवली शहरांत बहुतेक नोकरदार कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ रिक्षांना जास्त मागणी असते. अशा वेळी प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात अनेकदा वाद होतात. काही रिक्षाचालक अरेरावी करतात; मात्र आम्ही युनियनच्या रिक्षाचालकांना योग्य ती शिस्त लावायचा नेहमी प्रयत्न करतो. ‘प्रीपेड’ वाहतूक सुरूझाली, तर प्रवासी आणि रिक्षाचालकांतील वाद कमी होतील. प्रत्येक रिक्षाचालकाचा व्यवस्थित व्यवसाय होईल. तंटय़ाचे कारण उरणार नाही.

* वाढत्या वाहतूक कोंडीचा व्यवसायावर परिणाम होतोय?
शेअर रिक्षाचालकांना वाहतूक कोंडी मारक ठरते. शेअरप्रमाणे भाडे आकारणाऱ्या रिक्षांची शहरात संख्या जास्त आहे. संध्याकाळच्या वेळेस रेल्वे स्थानकात प्रवाशांची भली मोठी रांग लागलेली पाहावयास मिळते. रिक्षांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना रांगेत अर्धा ते एक तास ताटकळत उभे राहावे लागते. संध्याकाळच्या वेळेस वाहतूक कोंडीत रिक्षा अडकल्याने त्यांना रिक्षातील प्रवाशांना सोडून पुन्हा स्थानकातील प्रवाशांची दुसरी फेरी आणण्यासाठी जाण्यास भरपूर वेळ खर्ची पडतो.

* स्वतंत्र रिक्षा पार्किंग सुविधेचे काय?
रिक्षांची वाढती संख्या पाहाता या रिक्षा रात्रीच्या वेळेस सुरक्षित पार्किंग होणेही गरजेचे आहे. सध्या रिक्षाचालक स्वत:च रिक्षा पार्किंग सुविधा करतात. काही चालक त्यांच्या घराच्या जवळ पार्क करतात, तर काही वालधुनी येथील जागेत पार्क करतात. वालधुनी येथे रात्रीच्या वेळेस शंभर ते दोनशे रिक्षा पार्क केल्या जात असून महिना ३०० रुपये यासाठी चालक मोजत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने आम्हाला रिक्षा पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

* कल्याणमध्ये मीटरनुसार रिक्षा का नाहीत?
मीटरप्रमाणे रिक्षा सुरू करण्यास काही हरकत नाही; मात्र त्यात रिक्षाचालकांच्या काही अडचणी आहेत. त्याआधी दूर करायला हव्यात. शहरात आज मोठमोठी गृहसंकुले उभी राहात आहेत. या गृहसंकुलांचे अर्ज आमच्याकडे असून तेथील प्रवाशांना त्यांच्या दारात स्वतंत्र रिक्षा स्टॅण्ड हवा, अशी त्यांची मागणी आहे. प्रवाशांच्या मागणीनुसारच आज गल्ली तेथे रिक्षा स्टॅण्ड उभे राहिले आहे. जिथे नफा मिळणार तिथे व्यवसाय करण्यास रिक्षाचालक जाणारच. आज परिवहनचे दर रिक्षाच्या दराप्रमाणेच आहेत. रिक्षाचालक त्याच दरात इच्छित स्थळी हव्या त्या वेळेला उपलब्ध होतो. यामुळे रिक्षाचालकांची मागणी प्रवासी करत आहेत. मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याचा प्रयत्न शहरात झाला, मात्र शेअर भाडय़ाची सवय लागलेल्या प्रवाशांना ते भाडे अधिक वाटत असल्याने मीटर रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी दोन-तीन जण मिळून एकाच रिक्षातून प्रवास करतात आणि भाडे शेअर करतात. मग शेअर भाडय़ानेच प्रवास करण्यात काय हरकत आहे? प्रवाशांचीही मानसिकता बदलली पाहिजे, असे मला वाटते.

* यशाबद्दल किती विश्वास?
शासनाने राबविलेला हा उपक्रम चांगला असून तो यशस्वी नक्कीच होईल. शहरातील सर्व रिक्षा संघटनांचा त्याला पाठिंबा आहे. आता प्रवाशीही त्यासाठी पाठिंबा देतील, असा विश्वास आहे.