ठाणे : ठाण्यातील उच्चभ्रू गृहसंकुलाच्या आवारातील एका स्पा सेंटरमध्ये अश्लील कृत्ये सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करून चार जणांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चारही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.माजिवडा येथील साकेत रोड परिसरात गृहसंकुल आहेत. येथील गृहसंकुलाच्या आवारात एक स्पा सेंटर आहे.
या स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, चौधरी यांनी पथके नेमली. कारवाई दरम्यान या ठिकाणी स्पा च्या नावाखाली अश्लील कृत्य सुरु असल्याचे समोर आले. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे राबोडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९६, ३ (५) अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपींमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा सामावेश आहे. त्यांना अटक झाल्याची माहिती चौधरी यांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडून सुरू आहे.