ठाणे : ओला, उबर, रॅपिडोचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा तसेच बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी ओला, उबर, रॅपिडो कारचालकांनी संपूर्ण राज्यात मंगळवारपासून संप पुकारला आहे. मागण्या मान्य होत नसल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारीही ओला, उबर, रॅपिडो चालकांचा संप सुरू आहे. या संपात रिक्षाचालक सहभागी झालेले नाहीत. यामुळे ओला, उबर ॲपवर रिक्षा उपलब्ध होत असल्याने कामावर जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी रिक्षाचा आधार घेतला.
मुंबई महानगर क्षेत्रात राज्य परिवहन सेवा तसेच विविध महापालिकांच्या परिवहन सेवेच्या बस गाड्या चालवण्यात येतात. या बस गाड्या संपूर्ण महानगर क्षेत्रातील विविध मार्गांवर चालविण्यात येतात. परंतु गेल्या काही वर्षात मुंबई महानगर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्यामुळे या बसगाड्या प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत. यामुळेच अनेक प्रवासी हे खाजगी वाहतुकीकडे वळाल्याचे चित्र दिसून येते. स्वतःचे वाहन नेले तर ते उभे करण्यासाठी वाहनतळ शोधावे लागते आणि वाहनतळाची सुविधा असेल तर त्याचे शुल्क भरावे लागते. तसेच वाहतूक कोंडी मुळे इंधनावर पैसे जास्त खर्च होतात. या सर्वाचा विचार करून प्रवाशी आता ओला, उबर, रॅपिडो या खासगी कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेचा पर्याय निवडत आहेत. शिवाय वाहतूक कोंडीतून वाहन चालविण्याचा त्रासही सहन करावा लागत नाही आणि शेअरिंग पर्यायामुळे प्रवास खर्च कमी होतो. यामुळे कंपनीच्या वाहनांना प्रवाशांची मोठी मागणी असते. मात्र, विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी अचानकपणे संप पुकारला आहे.
संप दुसऱ्या दिवशीही सुरूच
ओला, उबर, रॅपिडो चे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा. बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको. रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणा. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करा, अशा प्रमुख मागण्यासाठी ओला, उबर आणि रॅपिडो कंपनीच्या वाहन चालकांनी मंगळवारी संप पुकारला. संपूर्ण राज्यात हा संप पुकारण्यात आला असून वाहनचालक मुंबईतील आझाद मैदान जमले होते. परंतु मागण्या मान्य होत नसल्यामुळे मंगळवारी रात्री संप सुरूच ठेवण्याची भूमीका घेतली. यामुळे दुसऱ्या दिवशीही चालकांचा संप सुरू असल्याने रस्त्यावर ओला, उबर, रॅपिडो या कंपनी तर्फे वाहतूक सेवा पुरविणारी वाहने रस्त्यावर नव्हती.
रिक्षाचा आधार
ओला, उबर, रॅपिडो या खासगी कंपनीमार्फत वाहतूक सेवा पुरविण्यात येते. यात वाहतुकीसाठी कार, रिक्षा असा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येतो. संपात कारचालक सहभागी झाले असले तरी, रिक्षाचालक मात्र सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी कामावर जाण्यासाठी प्रवाशांना ॲपवर कार उपलब्ध होत नव्हत्या. तर, याच ॲपवर रिक्षा मात्र उपलब्ध होत असल्याने प्रवाशांनी रिक्षाचा पर्याय निवडून प्रवास केला. यामुळे रिक्षाची मागणी वाढल्याचे चित्र दिसून आले.विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांचे हालओला, उबर, रॅपिडो या खासगी कंपन्यांची वाहने विमानतळापर्यंत प्रवासी वाहतूक करतात. तर, रिक्षांना विमानतळापासून काही अंतरावर प्रवेश बंद आहे. त्यामुळे विमानतळावर जाणाऱ्या किंवा तेथून येणाऱ्या प्रवाशांना कार उपलब्ध होत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत, असे एका चालकाने सांगितले.