कोंडी सोडविण्यासाठी १०० वाहतूक सेवक
ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी जुना रेल्वे उड्डाणपूल मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. येथील वाहतूक कोपरी येथील नव्या उड्डाणपुलावरून तसेच प्रायोगिक तत्त्वावर सेवारस्तेमार्गे वळविण्यात आली आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १०० वाहतूक सेवक आणि ३० हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहे. अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून दिवसाला हजारो वाहने मुंबईच्या दिशेने वाहतूक करत असतात. पूर्व द्रुतगती महामार्ग एकूण आठ मार्गिकेचा असला तरी कोपरी रेल्वे उड्डाणपूल हा चार मार्गिकेचा आहे. त्यामुळे कोपरी रेल्वे पुलावर वाहनांचा भार येऊन दररोज ठाणेकरांना सकाळी आणि रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे २०१६ मध्ये हा रेल्वे उड्डाणपूल नव्याने उभारणी आणि रुंदीकरणाचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या मार्गाच्या उभारणीच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात २४ एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आली. पोहोच रस्त्याचे काम एमएमआरडीएकडून केले जात आहे. जुन्या पुलालगत ठाण्याच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने नव्या मार्गिका तयार केल्यानंतर मुख्य जुन्या पुलाचे काम हाती घेण्यात येणार होते.
तीन महिन्यांपूर्वीच या नव्या मार्गिका तयार झाल्या असून या पुलावरून वाहतूकही सुरू झाली आहे. मंगळवार दुपारपासून ठाणे वाहतूक शाखेने जुना कोपरी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस बंद केला आहे. एमएमआरडीएकडून या पुलावर भराव टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर रेल्वेच्या लोखंडी तुळई या ठिकाणी बसविल्या जाणार आहेत. नव्या मार्गिकेच्या समान ही मार्गिका तयार केली जाणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या कामामुळे शहरात सकाळी ८ ते १० आणि रात्री ७ ते ११ या कालावधीत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांना एमएमआरडीएकडून १०० वाहतूक सेवक उपलब्ध झाले आहेत. बारा बंगला येथे तात्पुरते दुभाजक बसविले आहेत. कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळी व रात्री बाराबंगला मार्ग एकदिशा केला आहे.
प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक बदल
एकदिशा मार्ग- सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत तीन हात नाका सेवा रस्ता, गुरुद्वारा, भास्कर कॉलनी हा मार्ग ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एकदिशा करण्यात आला आहे. या कालावधीत मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने भास्कर कॉलनी, टेलीफोन नाका येथून वाहतूक करतील.
सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत भास्कर कॉलनी, गुरुद्वारा, तीन हात नाका हा सेवारस्ता मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी एकदिशा असेल. या कालावधीत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने मल्हार टॉकीज, टेलीफोन नाका येथून वाहतूक करतील.
सायंकाळी गुरुद्वारा ते तीन हात नाक्याच्या सेवारस्त्यावरून वाहतूक करण्यास बंद असेल. हे वाहतूक बदल दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी लागू असतील. चारचाकी वाहने नव्या कोपरी पुलावरून वाहतूक करू शकतील, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.