building Part collapsed in Thane ठाणे : वागळे इस्टटेट येथील किसननगर भागातील ३५ ते ४० वर्ष जुन्या चार मजली धोकादायक इमारतीच्या सज्जाचा भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. महापालिकेने इमारत रिकामी केली असून येथील रहिवाशांची तात्पुरत्या स्वरुपात ठाणे महापालिका शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
किसननगर येथील शाळा क्रमांक २३ परिसरात ३५ ते ४० वर्ष जुनी चार मजली इमारत आहे. ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे. इमारतीच्या तळाला सहा तर चार मजल्यांवर २० सदनिका, इमारतीच्या गच्चीवर तीन सदनिका आहेत. शुक्रवारी सकाळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सज्जाचा काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच, श्रीनगर पोलिस, महापालिका अधिकारी, महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकरी- कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण इमारत रिकामी करून तेथे धोकापट्टी बांधली. तसेच रिकामी केलेल्या इमारतीमधील ६० ते ७० रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यास सांगितले आहे. वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साहाय्यक आयुक्तांमार्फत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.असेही आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून सांगण्यात आले.