ओम साई पूजन को-ऑ. हौसिंग सोसायटी, बदलापूर पूर्व

२१ व्या शतकाच्या सुरुवातीला अंबरनाथ आणि बदलापूर शहरे खऱ्या अर्थाने आकार घेऊ  लागली. मुंबईतील कनिष्ठ मध्यमवर्गीय चाकरमानी बदलापूरसारख्या शहरात आपले हक्काचे घर शोधू लागले. त्यातून येथे गृहसंकुले वाढली. आता १५-२० वर्षांनंतर या इमारती जीर्ण झाल्या असल्या तरी परस्परांविषयी असलेला स्नेह, प्रेमाचा शेजारधर्म टिकून आहे. अशाच प्रकारे एक छप्पर एक कुटुंब या भावनेतून गेली १७ वर्षे सुखाने नांदणारी एक वसाहत म्हणजे बदलापूर पूर्वेतील पालिका मुख्यालयामागची ओम साई पूजन ही सोसायटी. आपल्या एकोप्याने इतरांपुढे त्यांनी चांगला आदर्श ठेवला आहे.

बदलापूर शहराची वाढ साधारण २००० मध्ये झपाटय़ाने होऊ लागली. नवनवीन गृहसंकुले उभी राहू लागली. त्यावेळी बांधण्यात आलेली गृहसंकुले आता १६ वर्षांची झाली आहेत. त्यामुळे या इमारती आता काहीशा जीर्ण, काळवंडलेल्या वाटू लागल्या आहेत. वरकरणी असे काहीसे जीर्ण स्वरूप दिसत असले तरी सोसायटीच्या अंतरंगात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण दिसते. परस्परांविषयी असलेली आपुलकी आणि जिव्हाळ्याने शेजारधर्माची घट्ट वीण येथे पाहायला मिळते. त्यातीलच एक सोसायटी म्हणजे बदलापूर पूर्वेतील पालिका मुख्यालयामागील ओम साई पूजन सोसायटी. पनवेलकर या नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी २००० मध्ये ही इमारत बांधली. एकूण साडेआठ हजार चौरस फूट जागेत उभारण्यात आलेल्या या गृहसंकुलात एकूण ४५ सदनिका आहेत. एक रूम किचन ते दोन बेडरूम किचन अशा तीन प्रकारच्या सदनिका असलेल्या या संकुलांत दोन विंग आहेत. साधारणत: पावणे दोनशे व्यक्ती या इमारतीत  राहतात. सोसायटी मराठीबहुल असली तरी इथे उत्तर भारतीय आणि मुस्लीमही गुण्यागोविंदाने राहतात. २००३ मध्ये ओम साई पूजन रहिवासी संकुल नोंदणीकृत करण्यात आले आहे. कन्व्हेअन्स डीडची प्रक्रियाही पाच वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आली आहे. सोसायटीतील सर्वच सदस्यांना संकुलाचा कारभार करता यावा, त्याचा त्यांना अनुभव घेता यावा, म्हणून फिरत्या पद्धतीने सर्वाना अध्यक्षपदाचा मान देण्यात येतो. त्यामुळे पदावरून होणारे वाद टाळण्यात यश आल्याचे सध्याचे अध्यक्ष कैलास म्हेत्रे यांनी सांगितले.

सोसायटीतील एकोपा टिकवण्यासाठी अनेक सोसायटीत सण उत्सव साजरे केले जातात. येथेही होळी, नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा आणि वर्षांतून एकदा २६ जानेवारीला स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. त्यात सोसायटीतील हौशी कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंतांचा सत्कार आणि स्नेहभोजन असे कार्यक्रम असतात. सोसायटीतील कला गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजनही यावेळी करण्यात येते. निरनिराळ्या वयोगटातील मुले, महिला आणि पुरुष या स्पर्धामध्ये सहभागी होत असतात. या उत्सवांचे नेतृत्व हे महिलांकडे असते. त्यांच्याकडेच पूर्ण कारभार असतो. त्यामुळे बचत होऊन सोसायटीचा पैसाही वाचतो आहे. येत्या काळात महिलांचे हेच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी महिला बचत गट तयार करण्याचाही आमचा मानस असल्याचे भावना घोलप सांगतात.

सण उत्सवांप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीही गेल्या १७ वर्षांत सोसायटीतील सदस्यांनी नेहमी प्रयत्न केले आहेत. मग तो २००५ चा दुर्दैवी महापूर असो वा त्यानंतरच्या विस्थापितांसाठी केली गेलेली मदत असो. संकुलांतील सदस्य नेटाने समाजकार्यात सहभागी होत असतात. दिवाळीत बदलापूरच्या वेशीवर असलेल्या आदिवासी पाडय़ांवर जाऊन सोसायटीतील सदस्य फराळ वाटप करत असतात. अनेकांना परिस्थितीअभावी सण साजरे करता येत नाही. त्यासाठी आम्ही सोसायटीतील सदस्य आदिवासी पाडय़ांवर जाऊन तेथील आदिवासी, लहान मुले यांना कपडे, फराळ आणि भेटवस्तू देत असतो. मतीमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संगोपिता, आधार या संस्थांनाही अनेकदा आम्ही भेट देत असतो. यामुळे सोसायटीतील नव्या पिढीमध्ये समाजभावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच आम्हीही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतूनही समाधान मिळते, असे सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य दिलीप नारकर सांगतात.

जुनी सोसायटी म्हटली की तेथे पाणी, सुरक्षा अशा अनेक समस्या असतात. मात्र या सोसायटीने सर्वाच्या सहकार्याने यावर मात केली आहे. सोसायटीच्या आवारात एक कूपनलिका आहे. तसेच पालिकेकडून येणाऱ्या पाण्यांच्या वाहिन्यांमुळे आणि त्याच्या योग्य नियोजनामुळे सोसायटीत पाणी प्रश्न उद्भवत नाही. दोन तीन वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या पाणीटंचाईवरही सोसायटीतील सदस्यांनी विनातक्रार मात केली होती. सोसायटीतील सर्वच घरातील फ्लश काढून टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो. शिळे पाणी फेकून देण्याच्या वृत्तीतही बदल करण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी प्रयत्न केले होते. गळती रोखण्यासाठी सोसायटी स्वत: प्रयत्न करत असते. त्यामुळे पाणीप्रश्न सहसा निर्माण होत नाही. पाणी भरण्यासाठी आणि ते वेळेवर सोडण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही.

सोसायटीचे सदस्यच आलटून पालटून हे काम करत असतात. त्यामुळे सोसायटीतील पाण्याचे नियोजन थेट कळते आणि पैसेही वाचत असल्याचे शशिकांत पाटणकर सांगतात. सोसायटीत कचऱ्याचा प्रश्न कधीच उद्भवत नाही. सर्वच सदनिकांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा टाकण्यात येतो. मात्र पालिका तो कचरा पुन्हा एकत्रितपणेच जमा करते याचे दुख: वाटत असल्याचे विजय राणे सांगतात. येत्या काळात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीतच लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे राणे सांगतात. सध्या सोसायटीत कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची तजवीज नाही. मात्र सतर्कता हीच आमची सुरक्षा असून सोसायटीतील लहान थोर प्रत्येक सदस्य सोसायटीत येणाऱ्या बाहेरील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अद्याप तरी निर्माण झालेला नाही.