अंबरनाथ: अंबरनाथ पूर्वेतील बाह्यवळण रस्त्यावर बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील शिवाजी नगर ते लोकनगरी या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी फायदेशीर ठरलेल्या बाह्यवळण रस्त्यावर गेल्या काही दिवसात बेदरकार वाहनांचे अपघात होत आहेत. या बाह्यवळण रस्त्यामुळे वाहनचालकांचा मोठा फेरा वाचतो. त्यात रस्त्याची रचना आणि सौंदर्य यामुळे या रस्त्यावर पादचाऱ्यांची संख्याही मोठी वाढली आहे. गतिरोधक मुक्त रस्ता असल्याने या रस्स्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातही झाले आहेत. असाच एक अपघात बुधवारी या बाह्यवळण रस्त्यावर झाला. बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावर एका भरधाव चारचाकीचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही चारचाकी थेट दुभाजकावर जाऊन आदळली आणि पलटी झाली. यात कार चालकाशेजारी बसलेल्या अनिल पंजाबी (३७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चारचाकीमधील इतर पाच जण जखमी झाले. या अपघाताप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी कार चालक सागर चांदवानी याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2022 रोजी प्रकाशित
भरधाव कारच्या भीषण अपघातात एक ठार ; अंबरनाथच्या बाह्यवळण रस्त्यावरील घटना, पाच जण जखमी
या अपघाताप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी कार चालक सागर चांदवानी याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-05-2022 at 17:02 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One killed 5 injured in car accident on bypass road in ambernath zws