ठाणे सत्र न्यायालयाचा अनोखा निकाल
हत्येच्या आरोपातील तीन आरोपींची ठाणे सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. मात्र या आरोपींच्या मागणीनुसार न्यायालयाने याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या पगारातून प्रत्येकी एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
२००७ मध्ये वसईत राहणारे सत्यनारायण जगन्नाथ मिश्रा, शंकर जगन्नाथ मिश्रा, वीरेंद्र केदारनाथ वर्मा, संजय सत्यनारायण मिश्रा आणि संतोष उर्फ पप्पू सत्यनारायण मिश्रा यांच्यावर इक्बाल उर्फ पप्पू याच्या हत्येचा आरोप होता. इक्बाल एका ठिकाणी गॅरेज आणि उपाहारगृह चालवत होता. त्याने ही जागा खाली करावी यासाठी हे पाच जण त्याला दमदाटी करत होते. त्यामुळे इक्बाल आणि त्यांच्यात नेहमी वाद होत असे. ७ जानेवारी २००७ रोजी इक्बालची हत्या झाली. त्यामुळे संशयाच्या बळावर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करत त्याच्यावर हत्येचा खटला भरवला.
जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगत पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या नावाखाली या सर्वाना अटक केली होती. पण पुराव्याच्या अभावी त्यांना जामीन मिळाला. ठाणे सत्र न्यायालयात या प्रकरणाचा खटला भरला होता आणि तब्बल १२ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. या प्रकरणातील आरोपी सत्यनारायण मिश्रा व वीरेंद्र वर्मा यांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला.
ठाणे सत्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीस एसबी बहालकर यांनी मंगळवारी या खटल्याचा निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मृक्तता केली. या खटल्यामुळे आपली मोठी मानसिक आणि वित्तहानी झाली असल्याने त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी आरोपींनी यावेळी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत तपास अधिकारी आर. बी. मोरे यांना चुकीच्या पद्धतीने तपास केला म्हणून तीनही आरोपींना आपल्या पगारातून प्रत्येकी एक रुपया भरपाई देण्यात यावी, असे सांगितले.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी मोरे यांनी चुकीच्या पद्धतीने आम्हाला आरोपी बनवले होते. यामुळे आम्ही न्यायालयाला एक रुपया भरपाईची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. – शंकर मिश्रा, निर्दोष मुक्तता झालेला आरोप