उल्हासनगरातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित

वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेली मात्र बंद असलेली कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरील सिग्नल यंत्रणा अखेर कार्यान्वित करण्यात आली आहे. या मार्गावरील सर्वाधिक वर्दळीच्या अशा शिवाजी चौक आणि शास्त्री चौकातील सिग्नल पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहेत.

तीनपैकी एका ठिकाणी सिग्नल सुरू, शिवाजी चौकात वाहतूक नियोजन

उल्हासनगर: वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेली मात्र बंद असलेली कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरील सिग्नल यंत्रणा अखेर कार्यान्वित करण्यात आली आहे. या मार्गावरील सर्वाधिक वर्दळीच्या अशा शिवाजी चौक आणि शास्त्री चौकातील सिग्नल पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहेत.

नागरिकांना सिग्नल अंगवळणी पडावेत यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन केले जाते आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. तर फॉरवर लाइन आणि सतरा सेक्शन चौकातील सिग्नल यंत्रणेची अद्याप अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही.

कल्याण-बदलापूर राज्यमार्गाचा मोठा भाग उल्हासनगर शहरातून जातो. सतरा सेक्शन, शास्त्री चौक, शिवाजी चौक, फॉरवर लाइन या चौकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. सतरा सेक्शन चौकात कॅम्प चार, विठ्ठलवाडी स्थानक, उल्हासनगर महापालिका मुख्यालय आणि शहाड स्थानकाकडे येजा करण्यासाठीचा महत्त्वाचा रस्ता आहे. शिवाजी चौकातही उल्हासनगर स्थानक, कॅम्प दोन, मुख्य बाजारपेठांकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. तर कॅम्प पाच, अंबरनाथ, मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर स्थानक आणि कल्याणकडे जाण्यासाठी फॉरवर लाइन चौक महत्त्वाचा आहे.

गेल्या वर्षांत महापालिकेच्या निधीतून येथे सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. सुरूवातीला रस्त्यावर चौकाचौकांमध्ये पादचाऱ्यांसाठी पट्टे, पिवळी रेषा आखली नसल्याने यंत्रणा सुरू करण्यात आली नव्हती. त्यात शिवाजी चौक, फॉरवर लाइन या चौकांमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली होती.

गेल्या काही महिन्यात फॉरवर लाइन चौकातील अडथळा ठरणारे रोहित्र, विजेचे खांब हटवण्यात आले. शिवाजी चौकातील अडथळे दूर करण्यात आले होते. अखेर मंगळवारपासून या मार्गावरील शिवाजी चौक भागातील सिग्नल यंत्रणा अखेर सुरू करण्यात आली आहे. वाहनचालकांसाठी उल्हासनगरात सिग्नल यंत्रणा नवीन असल्याने अनेकदा वाहनचालक सिग्नल तोडतात. मात्र वाहतूक पोलिसांकडून आता येथील वाहतुकीचे नियोजन केले जाते आहे.

सध्या दोन सिग्नलमधील वेळ निश्चित केला जातो आहे. त्यामुळे शास्त्री चौक आणि शिवाजी चौकातील सिग्नल प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहेत. लवकरच इतर सिग्नलही सुरू होतील.

विजय गायकवाड, पोलीस निरीक्षक, वाहतूक, उल्हासनगर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Operation signal system ulhasnagar ysh

ताज्या बातम्या