ठाणे शहरातील दोन उड्डाणपूल सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश * नव्या मुदतीत बांधकाम पूर्ण होण्याबाबत साशंकता

ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा वेग वाढावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या संथगती कामांमुळे या भागांतील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. हे पूल मे महिनाअखेरीस पूर्ण करण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने त्यानंतर वेगवेगळ्या मुदती जाहीर करूनदेखील पुलांची कामे अपूर्णच आहेत. याबद्दल टीका होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सप्टेंबरअखेरीस हे पूल खुले करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याआधी दोनदा दिलेली ‘डेडलाइन’ हुकल्यामुळे आता तरी पूल नवीन मुदतीत पूर्ण होणार का, अशी शंका व्यक्त होत आहे.

ठाणे शहरातील अंतर्गत भागात होणारी वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उड्डाणपुलांच्या कामांसाठी तब्बल २२७ कोटी रुपयांची रक्कम महानगर विकास प्राधिकरणाने महापालिकेकडे वर्ग केली असून स्थानिक प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे सुरू आहेत. नौपाडय़ातील एमजी रोड, मीनाताई ठाकरे चौक आणि वंदना चौकातील उड्डाणपुलांची कामे मंदगतीने सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पुढे आल्या आहेत. यापैकी वंदना चौकातील उड्डाणपूल एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदवीधर निवडणुकांच्या आचारसंहिता काळात ठाणेकरांसाठी खुला करून दिला असला तरी एमजी रोड आणि मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलांची कामे अजूनही सुरू आहेत.

एमजी रोड येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल उताराच्या ठिकाणी मूळ रस्त्याला निमुळता करत असल्याने या ठिकाणी मोठय़ा वाहनांची कोंडी होऊ लागली आहे. या उड्डाणपुलांवर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा प्रभावी नसल्याने येथून पाण्याचे फवारे खालून जाणाऱ्या प्रवाशांवर उडत आहेत. आयुक्त जयस्वाल आणि चव्हाण यांच्या सूचनांनंतरही मे महिन्याच्या अखेपर्यंत हे पूल पूर्ण झालेले नाहीत. तसेच येथील कोंडी कमी होईल यासाठीदेखील फारसे उपाय आखले गेलेले नाहीत. या पाश्र्वभूमीवर जयस्वाल यांनी नुकतीच महापालिका अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन नव्याने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करा, असे आदेश काढले आहेत.

महापालिकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमजी आणि मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलांची कामे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणे बंधनकारक आहे. ही मुदत कोणत्याही परिस्थितीत पाळा असे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत. शिवाय कळवा खाडीवरील पूल डिसेंबरअखेरीस म्हणजेच मुदतीत पूर्ण करा, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

कोपरी पुलाचे अडथळे दूर करणार

पुलांच्या कामांसंदर्भात नागरी संशोधन केंद्र येथे पार पडलेल्या बैठकीत एमएमआरडीए तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत कोपरी पुलाच्या कामात अडथळा ठरणारे वृक्ष स्थलातंरित करणे, पादचारी पुलाचे स्थळ निश्चित करणे तसेच जुना कोपरी पूल हलक्या वाहनांसाठी वापरता येईल का याबाबत आठवडाभरात चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचप्रमाणे कल्याण शीळ फाटा उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी तेथील विवध कामे या पावसाळ्यात पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.