भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण– शहापूर तालुक्यातील शेणवे-सरळगाव मार्गावरील किन्हवली गावातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीचे अनेक प्रयोग करुन भात लागवड, भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे लागवडीमध्ये भरघोस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने इतर शेतकरीही या शेतीकडे हळूहळू वळू लागले आहेत.

किन्हवली गावातील प्रयोगशील शेतकरी गुरुनाथ शिवराम उबाळे यांची गावा जवळ ३० गुंठे शेती आहे. या शेतीमध्ये उबाळे आपल्या कुटुंबियांच्या मदतीने भात पीक, काकडी, भेंडी, ढोबळी मिरची, मिरची, भोपळा, कारली अशी हंगामाप्रमाणे पीक घेत आहेत. ही लागवड करताना कोठेही रासायनिक खताचा वापर होणार नाही याची काळजी ते घेतात. हंगामाप्रमाणेची सर्व लागवड सेंद्रीय शेती पध्दतीने केली जाते.

हेही वाचा >>> “महाराष्ट्रातील सरकार भक्कम असून, ताकदीने काम करतंय”; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा

गुरुनाथ यांनी सितारा, सीजन कंपनी या मिरचीच्या दोन वाणांची लागवड केली आहे. या लागवडीला शेण, मलमूत्र यांचे कुजवलेले जीवामृत, कीड रोग पडला तर त्यावर दहा झाडांच्या पानांचा अर्क फवारणी, राख, माती मिश्रित खाटी, खत म्हणून कुजलेला पालापाचोळा, शेण यांचा वापर केला जात आहे. ४८ दिवसात फुलोऱ्यावर येणारे मिरचीचे पीक ४६ दिवसात फुलोऱ्यावर आले आहे, असे गुरुनाथ यांनी सांगितले.

सेंद्रीय साधनांचा प्रभावी योग्य वापर करण्यात येत असल्याने रोपे तजेलदार आणि फुलोऱ्याला फळांचा बाज अधिक येत आहे. नैसर्गिक, घर परिसरातील साधनांचा वापर करुन करण्यात येत असलेल्या सेंद्रीय शेतीसाठी कष्ट, मेहनत यांची गरज आहे. या पध्दतीमुळे बाजारातील खर्च मात्र टळतो, असे प्रयोगशील शेतकरी गुरुनाथ उबाळे यांनी सांगितले. सेंद्रीय शेतीच्या कामांसाठी वडील शिवराम उबाळे, प्रकाश उबाळे, मयूर गायकवाड, रिंकू दळवी, प्रफुल्ल उबाळे यांची गुरुनाथ यांना साथ मिळत आहे. काकडी, कारली, भेंडी, कोबी, पपई, शेवगा अशी पिके उबाळे कुटुंबिय घेत आहे.

हेही वाचा >>> ठाण्यातील रस्त्यालगत राडारोड्याचे ढिग कायम ; आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित विभागाचे दुर्लक्ष 

सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला, फळ पिके घेत असल्याने त्याला बाजारातील भाजीपाल्यापेक्षा वेगळी चव असते. हा भाजीपाला खरेदीसाठी स्थानिक ग्राहक अधिक संख्येने येतात. मागील वर्षी सेंद्रीय पध्दतीने भात पिकाची लागवड केली होती. त्यावेळीही भरघोस भातपिकाचे उत्पादन झाले होते, असे गुरुनाथ सांगतात. आपल्या या उपक्रमाची पाहणी, माहिती करण्यासाठी विविध भागातील शेतकरी येतात. त्यांनीही या शेतीला प्राधान्य द्यावे यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत, असे गुरुनाथ यांनी सांगितले.

लागवडीच्या बाजुला कुपनलिका आहे. सिंचन पध्दतीचा वापर करुन पिकांना पाणी दिले जाते. स्थानिक बाजारात भाजीपाला विक्री होते, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ सेंद्रीय शेती कष्ट, मेहनतीची आहे. सेंद्रीय भाजीपाला, भात लागवडीत कमी पैशातून अधिक मेहनत घेऊन दर्जेदार, गुणवत्तेचे उत्पादन घेता येते. अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळून जमिनीची सुपिकता वाढी बरोबर लागवड वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.”

गुरुनाथ उबाळे – प्रयोगशील शेतकरी किन्हवली