अनियमित, परिणामशून्य फवारणी होत असल्याचा रहिवाशांचा आरोप

अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या याबाबत तक्रारी वाढल्या असून फवारणी करण्याकडे दोन्ही नगरपालिका प्रशासनांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. अंबरनाथ शहरात सहा महिन्यांपासून धूरफवारणी बंद करण्यात आली आहे. करोनाच्या संकटात निरोगी आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न होत असताना पालिका प्रशासनाच्या या अनियमित फवारणीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

करोनाच्या काळात गेल्या वर्षभरापासून स्थानिक पालिका रुग्णालयाप्रमाणे काम करत होत्या. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरसारख्या छोटय़ा नगरपालिका असतानाही आणि करोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला असतानाही या पालिकांनी करोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यात यश मिळवले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही शहरांतील करोनाच्या रुग्णांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आपले लक्ष करोना नियंत्रण कार्यक्रमावरून सर्वसामान्य पालिकेच्या कारभारावर केंद्रित केले आहे. मात्र करोनाचे गांभीर्य कमी होत असताना शहरात नियमितपणे होणाऱ्या औषध आणि धूरफवारणीच्या कामांकडेही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत गेल्या काही दिवसांत डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे. करोनातून मोकळीक मिळाल्याने आता नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या डासांमुळे बाहेर पडणे आजाराना आमंत्रण देण्यासारखे होत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक देत आहेत. घरांमध्येही डासांमुळे दारे-खिडक्या बंद करूनच राहावे लागत असल्याचे तक्रारी वाढल्या आहेत.

योग्य फवारणी होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही सध्या र्निजतुक करण्यालाच प्राधान्य दिले जात असल्याने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेली धूरफवारणी गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले जात आहे. अंबरनाथ शहरातील लोकप्रतिनिधींनी आता याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या माजी नगरसेविका रेश्मा गुडेकर यांनी याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत राठोड यांना पत्र लिहून बंद असलेली धूरफवारणी तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. बदलापूर पश्चिमेतील मोहनानद नगर, मांजर्ली, हेंद्रेपाडा, पूर्वेतील शिरगाव आपटेवाडी, कात्रप परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.

तांत्रिक त्रुटी

अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी याबाबत संपर्क  साधला असता तांत्रिक त्रुटींमुळे हे काम थांबले असल्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले. लवकरच ते सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बदलापूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क होऊ  शकला नाही.