उल्हासनगरः महानगरपालिकेतील अंध दिव्यांग काठी खरेदीतील कथित भ्रष्टाचार तसेच गेली २० वर्षे प्रलंबित असलेल्या दिव्यांगांच्या स्टॉल वाटप प्रकरणावरून शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी प्रहार जनशक्ती पक्षाने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर डोळ्यांवर काळी पट्टी बांधून प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी दिव्यांग बांधवही उपस्थित होते.

स्वांत्र्य दिनी एकीकडे सर्वत्र झेंडा फडकवण्याचे कार्यक्रम सुरू असताना, उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयासमोर अंध, दिव्यांग बांधवांनी जोरदार आंदोलन केले. दिव्यांग बांधवांनी पालिकेच्या मुख्यालाबाहेरचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता. यावेळी अंध बांधव आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यात आली होती. उल्हासनगर महापालिका प्रशासनाला दिव्यांग बांधवांनी जुन्या मागण्यांची आठवण करून देण्याासाठी केलेले हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.

अंध दिव्यांग बांधवांच्या स्मार्ट काठी घोटाळ्याबाबत विभागीय चौकशीचे आदेश झाले असले, तरी कंत्राटदाराविरोधात अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. तसेच, दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल देण्याच्या संदर्भात एका महिन्यात निर्णय घेण्यात येणार होता. मात्र मुदत संपूनही प्रभाग अधिकाऱ्यांनी कोणतीही सकारात्मक पावले उचललेली नाहीत. महापालिकेच्या हद्दीत सुमारे २२०० दिव्यांग नागरिक असून, त्यांच्यासाठी प्रभागनिहाय केवळ १० ते १२ स्टॉल उपलब्ध आहेत. ही दिव्यांगांची थट्टा असून, प्रशासनाची ही भूमिका असंवेदनशील असल्याचा आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाने केला.

आंदोलनादरम्यान पक्षाचे ॲड. स्वप्निल पाटील यांनी सांगितले, मागील एका वर्षापासून या घोटाळ्याचा पाठपुरावा सुरू आहे. प्रत्येक आंदोलनाच्या आदल्या किंवा त्याच दिवशी प्रशासन फक्त आश्वासन देते, पण कृती होत नाही. जर सत्ताधारी आमदारच आयुक्तांसमोर हतबल असतील, तर दिव्यांगांना न्याय कुणाकडून मिळणार, असा प्रश्न पाटील यांनी बोलताना उपस्थित केला.

आंदोलनाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि डॉ. धीरज चव्हाण यांनी १५ दिवसांत ठोस कारवाई करण्याचे आणि स्टॉल वाटप प्रक्रियेची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ तारीख पुढे ढकलण्याची प्रवृत्ती सुरू राहिल्यास प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत महापालिकेत तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.