कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पाच हजार १०० हेक्टर जमिनीवर भात पिकासाठी पेरा केला आहे. यामध्ये ३०० हेक्टर जमिनीवर टोकन यंत्र (एसआरटी) पध्दतीने भार पेरणी करण्यात आली आहे. चार हजार ८०० हेक्टर जमिनीवर भाताच्या रोपवाटिका (राब) तयार करण्यात आले आहेत. ‘एसआरटी’ पध्दतीने भात लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक प्रमाणात वाढत आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

पाऊस वेळेवर सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात भात पेरणीला सुरूवात केली. भात पेरणीसाठी समाधानकारक पाऊस पडत आहे. मागील पाच ते सहा वर्षापासून जिल्हा कृषी विभाग शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणात ‘सगुणा राईस तंत्रज्ञान’ (एस. आर. टी.) पध्दतीने भात लागवड करावी म्हणून प्रयत्नशील आहे. सुरूवातीच्या काळात शेतकऱ्यांना ही पध्दत अवघड वाटत होती. पण, एस. आर. टी. या टोकण पध्दतीने भात पेऱ्याचे महत्व शेतकऱ्यांना कळू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता अधिक प्रमाणात या लागवडीकडे वळू लागला आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक पाचे यांनी सांगितले.

ही लागवड कमी मेहनत, कमी खर्चिक असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येऊ लागले आहे. एस. आर. टी. पध्दतीने शेतात ओटे ओढून भात पेरणी केल्यानंतर शेतकऱ्याला त्या शेतात गवत येणार नाही, त्याला खेकडे खाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. ही लागवड केल्यानंतर पुन्हा २० ते २५ दिवसांनी लागवड केलेले भात चिखलात लावण्याची (आवणी) गरज लागत नाही.

जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये एस. आर.टी. (टोकन पेरणी) पध्दतीने ३०० हेक्टर भात क्षेत्रावर लागवड झाली आहे. चार हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी भाताच्या रोपवाटिका (राब) तयार केले आहेत. या राबांमधील भाताची रोप चिखलणी करून लावली जातील. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे, खतांचा पुरवठा केला आहे, असे अधीक्षक पाचे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी हळवार (६० दिवसात पीक), गरवी (१२० दिवसात पीक) पध्दतीच्या जमिनीप्रमाणे अस्मिता, शुभांगी, सुवर्णा, ६४-६४, एककाडी, सिकंदर, कर्जत अशा अनेक भात बियाणांची लागवड केली आहे.

महागडी मजुरी

यापूर्वी राब पेरल्यानंतर वीस दिवसांनी शेतकरी भात लागवडीसाठी (आवणी) जात असे. यापुर्वी घरातील माणसे, मजुरांच्या साहाय्याने शेती लावली जात होती. आता मजूर मिळेनासे झाले आहेत. एक दिवसाची मजुरी ५०० ते ६०० रूपये झाल्यामुळे शेती परवडेनासी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी एस.आर.टी. पध्दतीच्या कमी मेहनतीच्या भात लागवडीला प्राधान्य दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यात ३०० हेक्टर भात क्षेत्रावर एस.आर.टी. पध्दतीने, ४८०० क्षेत्रावर रोपवाटिका पध्दतीने भात पेरा झाला आहे. एस. आर. टी. पध्दतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. गादी वाफ्याच्या भात लागवडीचे पथदर्शी प्रयोग यावेळी केले जाणार आहेत.- रामेश्वर पाचे, जिल्हा कृषी अधीक्षक,