कल्याण – उल्हासनगर जवळील पालेगाव भागात एका बैलगाडीला एका डम्परने २९ वर्षापूर्वी जोराची धडक दिली होती. या डम्परच्या धडकेत बैलगाडीमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या वारसांनी मोटार अपघात वाहन न्याय प्राधिकरणाकडे भरपाईसाठी दावा दाखल केला होता. २३ वर्ष भरपाईसाठी लढा दिल्यानंतर मृत शेतकऱ्याच्या वारसांना न्यायधिकरणाचे न्यायाधीश पी. आर. अस्थुरकर यांनी ट्रकचा मालक आणि त्या वाहनाची विमा कंंपनी यांना दोन लाख ८० हजार रूपये नुकसान भरपाई निकालाच्या दिवसांपासून सहा टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले.
उल्हासनगर ग्रामीण भागातील शेतकरी भाऊ वाळकू गायकर (६६) हे या बैलगाडी अपघातात मरण पावले होते. भाऊ यांचे वारस रमाबाई भाऊ गायकर, मोतिराम भाऊ गायकर, मारूती भाऊ गायकर, अनिता संतोष गायकर, भावना संतोष गायकर यांनी भरपाईप्रकरणी मोटार अपघात प्राधिकरणाकडे दावा दाखल केला होता. गायकर यांच्या वारसांतर्फे ॲड. प्रमोद पाटील, डम्पर मालकाच्या बाजुने ॲड. व्ही. बी. पाटील, नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्यावतीने ॲड. अरविंद तिवारी यांनी न्यायाधिकरणासमोर बाजू मांडली. डम्पर चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा बैलगाडी अपघात झाला. यामध्ये भाऊ गायकर यांचा मृत्यू झाल्याचे निष्कर्ष न्यायाधिकरणाने पोलिसांच्या चौकशी अहवालाच्या आधारे निर्णय देताना नोंदविला.
याप्रकरणाची माहिती अशी, की उल्हासनगर शहराजवळील पाले गाव परिसरातील शेतकरी भाऊ वाळकू गायकर हे १६ एप्रिल १९९६ मध्ये आपली शेतीची कामे उरकून रस्त्याच्या एका बाजुने बैलगाडीने चालले होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात एक डम्पर आला. त्या डम्परने बैलगाडीला पाठीमागून जोराची ठोकर दिली. या धडकेत बैलगाडीवान भाऊ गायकर जागीच ठार झाले. बैलगाडीचे नुकसान झाले.
भाऊ यांचा मुलगा मोतिराम आणि इतर वारसांनी ॲड. प्रमोद पाटील यांच्यातर्फे या अपघातप्रकरणी मोटार वाहन अपघात न्यायधिकरणाकडे भरपाईसाठी दावा दाखल केला होता. भाऊ यांचे महिन्याचे उत्पन्न दोन हजार रूपये होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ६६ होते. न्यायालयाने त्यांच्या भविष्यकालीन जीवन वाटचालीचा विचार करून भाऊ यांचे हयात असतानाचे ९० हजार रूपये त्यानंतरच्या जीवन वाटचालीचे एकूण एक लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे मत नोंंदवले. इतर खर्चासाठी १५ हजार रूपये अशी एकूण दोन लाख ६० हजार रूपयांची भरपाई न्यायाधिकरणाने देण्याचे आदेश प्रतिवादींना दिले.
प्रतिवादींनी त्रृटी काढून दावे फेटाळण्याची मागणी केली. न्यायाधिकरणाने ती फेटाळली. २३ वर्ष ११ महिने आणि १६ दिवस एवढा प्रदीर्घ काळ हा दावा का चालला याविषयी न्यायाधिकरणाने आश्चर्य व्यक्त केले. भरपाईचा दावा अंतिम टप्प्यात असताना भरपाई दावेदाराकडून वारसदार रमाबाई भाऊ गायकर या २००५ मध्ये मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र न्यायाधिकरणासमोर सादर केले. यावेळी न्यायालयाने २० वर्षानंतर हे प्रमाणपत्र का सादर केले असे प्रश्न करून दावा दाखल केल्याच्या तारखेऐवजी निकाल दिल्याच्या (६ नोव्हेंंबर २०२५) तारखेपासून प्रतिवादींनी भरपाई देण्याचे आदेश दिले. मोतिराम आणि मारूती यांनी प्रत्येकी ९३ हजार आणि आणि अनिता, काजल गायकर यांनी प्रति ४७ हजार रूपये वाटून घेण्याचे आदेश दिले.
