कल्याण – कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली भागातील एका शाळेचे व्यवस्थापन सदस्य आणि याच शाळेतील मुख्याध्यापिका शाळेत काही अश्लील प्रकार करत असल्याची दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. असे गैरप्रकार शाळेत सुरू असतील तर ते विद्यार्थ्यांवर काय संस्कार करतील, असे प्रश्न संतप्त पालकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या घडल्या प्रकाराबद्दल एका पालकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. शाळेतील या प्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घ्यावी. आणि या शाळेतील मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापन सदस्यावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे. या दृश्यचित्रफितीचा आधार घेत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी कोळसेवाडी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. पण हा प्रश्न शिक्षण विभागाशी निगडित आहे, असे सांगून पोलिसांनी एका पालकाची तक्रार दाखल करून घेतली.
यासंंदर्भात ठाकरे गटाच्या भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आशा रसाळ यांनी माध्यमांना सांगितले, बदलापूरच्या घटनेने यापूर्वीच पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलाविषयी अधिक जागरूक आहे. अशा परिस्थितीत कल्याणमधील शाळेत शाळेची मुख्याध्यापिका, व्यवस्थापन सदस्यच शाळेत गैरप्रकार करत असतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल. याविषयी अनेक दिवस पालकांमध्ये कुजबुज सुरू होती. ही दृश्यचित्रफित समोर आल्यामुळे हा प्रकार उघडकीला आला आहे.
याप्रकरणी शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे, असे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी शासकीय यंत्रणांनी दखल घेतली नाहीतर शिवसेना शाळे समोर उग्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा आशा रसाळ यांनी दिला आहे. आपली मुले जात असलेल्या शाळेत अश्लील गैरप्रकार चालतात हे ऐकून पालक संतप्त झाले आहेत. पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी पालकांनी केली आहे.