बेकायदा भाडेवाढीविरुद्ध अवघ्या १०० तक्रारी, चालकांची मुजोरी कायम
अंबरनाथ : भाडे नाकारणे, अधिकचे भाडे आकारणे अशा विविध तक्रारींसाठी कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे एक मोबाइल क्रमांक जाहीर करून त्यावर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, समाजमाध्यमांवर, रस्त्यावर रिक्षाचालकांशी वाद घालणाऱ्या प्रवाशांनी अधिकृत परिवहन विभागाकडे तक्रार करण्याकडे मात्र पाठ फिरवली आहे.
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरात अवघ्या शंभर तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे रिक्षा प्रवासी फक्त समाजमाध्यमांवर तक्रारी करण्यातच समाधानी असल्याचे दिसते आहे. त्याचा थेट फायदा मुजोर रिक्षाचालकांना होतो आहे.
कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील रिक्षांचे नवे दर गेल्या महिन्यात कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने जाहीर केले. यात काही ठिकाणी रिक्षांचे दर वाढले तर उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरसारख्या शहरात रिक्षांच्या भाडे दरात कपात झाली. त्याविरुद्ध रिक्षाचालक आणि त्यांच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या. अंबरनाथ शहरात बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील रिक्षाचालक एकवटले होते. त्यांनी या भाडे कपातीला थेट विरोध केला होता. इतक्यावरच या संघटना थांबल्या नाहीत तर अंबरनाथ शहरात रिक्षा संघटनांनी स्वत:चे वेगळे दरपत्रक जाहीर केले होते.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानेही आक्रमक भूमिका घेत अतिरिक्त भाडे घेणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाईसाठी दंड थोपटले होते. त्यासाठी विभागातर्फे एका मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आला होता. त्या क्रमांकावर रिक्षा चालकाचा, रिक्षाचा फोटो आणि माहिती तक्रारस्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले होते. आठवड्याभरानंतर या आलेल्या तक्रारींचा निपटारा केला जाणार होता.
गेल्या महिनाभरात वाढलेल्या भाड्यांबाबत समाजमाध्यमांवर रिक्षाचालकांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रवाशांनी अधिकृत तक्रार करण्याकडे मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली परिसरातून अवघ्या शंभर तक्रारीच विभागाकडे आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली आहे. तक्रारी न आल्याने मुजोर रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करणे अवघड होते आहे. त्यामुळे प्रवाशांचा निरुत्साह मुजोर रिक्षाचालकांच्या पथ्यावर पडतो आहे.
कारवाई करणे अवघड
कल्याण उपप्रादेशिक विभागात सुमारे ४० ते ५० हजार रिक्षा आहेत. सुमारे दोन ते तीन लाख प्रवासी दररोज रिक्षाने प्रवास करतात. एवढ्या प्रमाणात प्रवासी असूनही तक्रारी मात्र अवघ्या काही असल्याने प्रवाशांना तक्रारी करण्यात रस नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मनमानी भाडेवाढीविरुद्ध कारवाई करणे कठीण जाईल, असे परिवहन विभागाचे अधिकारी सांगत आहेत.
गेल्या महिनाभरात अधिकडे भाडे आकारणे आणि इतर अशा १०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्यावर परिवहन नियमांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. – तानाजी चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.