म्युकरमायकोसिसची वाढती भीती; न घाबरण्याचे डॉक्टरांचे आवाहन

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : डॉक्टर माझे डोळे दुखत आहेत.. काही तरी टोचल्यासारखे होतेय, मला नव्या आजाराने तर ग्रासले नाही ना, डॉक्टर दात दुखतोय, डोळे लाल होत आहेत. म्युकर तर नाही ना.. गेल्या काही दिवसांपासून अशा तक्रारी घेऊन ठाणे शहरातील कान-नाक-घसातज्ज्ञ तसेच परिसरातील डॉक्टरांकडे रुग्णांच्या अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. काही जणांना तपासणी केल्याशिवाय समाधान मिळत नाही. त्यामुळे डोळ्यांच्या तपासणीसाठी गर्दी वाढू लागल्याचे कान-नाक-घसातज्ज्ञांचे म्हणणे आहे. काळजी घेणे उत्तमच, परंतु अनेकांना भीतीने ग्रासले आहे, असे निरीक्षणही काही तज्ज्ञांनी नोंदविले.

करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या साखरेची पातळी अनियंत्रित असल्यास म्युकरमायकोसिसचा आजार बळावण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. काळी बुरशी असे वर्णन केले गेलेल्या या आजाराचा धसका अनेकांनी घेतल्याचे आता दिसू लागले आहे. ठाणे परिसरात नामवंत अशा कान-नाक-घसातज्ज्ञांचे दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अधिकचे रुग्ण तपासणीसाठी येऊ लागले आहेत. ठाण्यातील प्रसिद्ध कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांच्याकडे दिवसाला अशा पाच ते सहा व्यक्ती म्युकरमायकोसिसच्या भीतीपोटी तपासणीसाठी येत आहेत. त्यांच्या शंकांचे निरसन ते करत आहेत. जर तुमची साखर नियंत्रणात असेल तर तुम्हाला म्युकरमायकोसिसचा धोका नसल्याचे डॉ. भूमकर यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी ज्याप्रमाणे प्राणवायूच्या तपासणीसाठी ऑक्सिमीटर खरेदी केले आहेत. त्याप्रमाणे साखरेच्या तपासणीसाठी ग्लुकोमीटरही विकत घ्यावेत. त्यामुळे दररोज घरामध्ये तुम्हाला साखरेची पातळी तपासणे शक्य होईल. ज्या व्यक्तींना करोना झाला होता. त्यांनी करोनाची लक्षणे दिसल्यापासून १०० दिवसांच्या आत नाक-डोळे-दाताचा त्रास झाल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

स्टेरॉइड्स घेतलेले तसेच मधुमेह आणि करोना झालेल्या रुग्णांनाच म्युकरमायकोसिस होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. इतरांनी म्युकरमायकोसिसचा जास्त धोका बाळगू नये. एखादा करोनाबाधित रुग्ण करोनातून बरा झाल्यानंतर त्याने त्याचवेळी डॉक्टरांना सांगून नाक, डोळे तपासून खात्री करून घ्यावी.

– डॉ. प्रदीप उप्पल, कान-नाक-घसातज्ज्ञ

म्युकरमायकोसिस हा जुना आजार आहे. करोनाकाळात नागरिकांच्या मनात या आजाराची भीती निर्माण झाली आहे. मलाही दिवसाला २० ते २५ जण संपर्क साधत असतात. नागरिकांनी त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. करोनातून बरे झालेल्या नागरिकांनी शंका वाटली तरच तपासणी करावी. तसेच ज्यांची साखरेची पातळी अनियंत्रितआहे, त्यांनी ती नियंत्रित ठेवावी. काळजी घ्यायला हवी मात्र भीतीच्या छायेखाली वावरण्याचे काहीच कारण नाही.

– डॉ. कैलाश पवार, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्युकरमायकोसिसबद्दल माध्यमांमधून सतत माहिती पुढे येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत अशी भीती व्यक्त करणारे अनेक जण होते. प्रतिकारशक्ती चांगली असल्यास, साखरेचे प्रमाण नियंत्रित असल्यास विनाकारण तपासण्या करण्याची गरज नाही. अनेक जण चेहऱ्यावर काळा डाग पडला तरीही घाबरू लागले आहेत. नागरिकांनी मनात भीती बाळगू नये.

– डॉ. यश वेलणकर, मानसोपचारतज्ज्ञ