लोकसत्ता प्रतिनिधी
डोंबिवली : पत्रीपुलाला ९० फुटी रस्त्यापासून थेट जाऊन मिळणारा पोहोच रस्ता मागील सहा वर्षांपासून एका खासगी भूखंड मालकाने आडकाठी केल्याने रखडला आहे. पत्रीपुलाच्या तुळई बसविण्याचे काम सुरू असतानाच रखडलेल्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी प्रवाशांची मागणी होती. ही मागणी पालिका प्रशासनाने मान्य करून विकास आराखडय़ाप्रमाणेच पोहोच रस्ता तयार करून त्याच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम पूर्ण केले .
ठाकुर्ली-चोळे म्हसोबा चौकातून सुरू होणारा ९० फुटी रस्ता पत्रीपुलाजवळील चौकात संपतो. कचोरे गावच्या हद्दीत मोहन सृष्टी गृहसंकुलाजवळून हा रस्ता सरळ पत्रीपुलाच्या दिशेने जातो. हा रस्ता विकास आराखडय़ातील आहे. हे माहिती असूनही भविष्यात या ठिकाणी रस्ता होईल. या मोक्याच्या ठिकाणी आपणास रग्गड मोबदला पालिकेकडून मिळेल या विचारातून एका लोकप्रतिनिधीच्या मुलाने विकास आराखडय़ातील रस्त्यात काही वर्षांपूर्वी भूखंड खरेदी केला. ९० फुटी रस्त्याचे काम पत्रीपुलाच्या ३०० मीटपर्यंत आले तसे खासगी भूखंड मालकाने पालिकेला रस्ता करून देण्यास विरोध केला. मागील पाच ते सहा वर्षांच्या काळात प्रशासनाने टीडीआर, सर्व प्रकारचे मोबदले देण्याचा प्रयत्न या भूखंड मालकाला केला. त्याने त्यास नकार देऊन आपणास भूसंपादन कायद्याने रोख रक्कम पाहिजे, अशी अट पालिकेला घातली. ही रक्कम सुमारे सहा ते सात कोटींच्या घरात जाते. एवढी रक्कम पालिकेच्या नाजूक आर्थिक परिस्थितीने देणे शक्य नसल्याने प्रशासन याविषयी हतबल होते. माजी आयुक्त ई. रविंद्रन यांनी भूखंड मालकावर दबाव वाढविण्यासाठी ९० फुटी पोहोच रस्त्याचा रखडलेला २०० मीटरचा भाग खासगी भूखंड मालकाच्या जमिनीपर्यंत नेऊन तेथपर्यंत काँक्रीटचा रस्ता तयार करून घेतला. उर्वरित १०० मीटरचा पोहोच रस्ता पूर्ण झाला तर कचोरे गावाच्या तोंडावर ९० फुटी रस्त्याने येणारी जी वाहनकोंडी होते ती कमी होणार आहे. दररोज सकाळ, संध्याकाळ कचोरे गावच्या वेशीवर अरुंद रस्त्यामुळे कोंडी होती. ही कोंडी सोडविण्यासाठी रखडलेला पोहोच रस्ता पूर्ण होणे आवश्यक होते.
पत्रीपुलाची तुळई बसविण्याचे काम सुरू असताना कचोरे प्रभागाच्या नगरसेविका रेखा चौधरी, आमदार प्रमोद पाटील यांनी आयुक्तांकडे मागणी करून कोणत्याही परिस्थितीत रखडलेला ९० फुटी रस्त्याचा पत्रीपुलाजवळील रस्ता पूर्ण झाला पाहिजे, अशी मागणी केली. पत्रीपुलाजवळील वाहतूक कोंडी कायमची सुटली पाहिजे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे ठाम मत असल्याने त्यांनी नगररचना विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रखडलेल्या रस्त्याच्या सीमारेषा निश्चित करून त्याप्रमाणे काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.
भूखंड मालकाला त्याच्या मनाजोगता मोबदला प्रशासनाकडून देण्यात आल्याचे कळते. नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याने पत्रीपुलाजवळील रखडलेल्या रस्त्याचे दोन्ही बाजूचे सीमांकन केले असल्याचे सांगितले. रखडलेल्या पोहोच रस्ते कामासाठी तीन ते चार चाळीतील ३९ रहिवाशांनी पालिकेला घरे उपलब्ध करून दिली आहेत.