कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील काही भागांतील पेव्हर ब्लाॅक सुट्टे झाले आहेत. सैल झालेल्या या पेव्हर ब्लाॅकवरून जाताना प्रवाशांचा पाय घसरून अनेक प्रवासी घसरून पडत आहेत. दररोज हा प्रकार फलाटावर सुरू आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

सकाळच्या वेळेत घाईघाईत प्रवासी फलाटावरून धावत जाऊन लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात. लोकलच्या दिशेने धावत असताना प्रवासी फलाटावरील लाद्या सुस्थितीत आहेत, असा विचार करून धावत असतात. अशा प्रवाशांना सुट्टे झालेल्या पेव्हर ब्लाॅकचा सर्वाधिक फटका बसतो. फलाट तीन आणि चारवर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लाॅक सुट्टे झाले आहेत. रेल्वे अधिकारी दररोज या भागात येजा करतात. रेल्वेच्या प्रवासी व्यवस्थापन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात पाहणी करून प्रवासी सुविधा तत्पर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक फलाटावर पाणी, सुस्थितीत फलाट असले पाहिजेत. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावीत, अशा सूचना प्रवासी संघटनेने केल्या आहेत. संघटनेने सूचना करूनही कल्याण रेल्वे स्थानकातील सुट्टे झालेले पेव्हर ब्लाॅक काढून त्याठिकाणी नवीन पेव्हर ब्लाॅक किंवा तेथे सिमेंटचा गिलावा टाकून ते सुस्थितीत केले जात नाहीत, असे प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमधील काळा तलाव येथे अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेव्हर ब्लाॅक निघालेल्या ठिकाणी दररोज सकाळ, संध्याकाळ प्रवासी पाय घसरून पडतात. काहींच्या पायाला दुखापत झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. स्थानिक अधिकाऱ्यांना तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात येत नाही, असे प्रवाशांनी सांगितले. डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिन्यांवरील काही ठिकाणच्या लाद्या सैल झाल्या आहेत. काही ठिकाणी लाद्या निघाल्या आहेत. त्या सुस्थितीत करण्याची प्रवाशांची मागणी आहे.