नायगाव पूर्वेच्या गावांचा निर्णय; पाझर तलाव आटल्याने पाणीप्रश्न बिकट
पाझर तलाव आटल्याने नायगावच्या पूर्वेच्या काही गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट झाला. मात्र पाणीटंचाईवर मार्ग काढत या गावांमधील शेकडो ग्रामस्थ स्वखर्चाने तलाव खोदणार असून पाण्याची पातळी वाढविणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामस्थांनी परवानगी मागितलीे आहे. अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील जुचंद्र, चंद्रपाडा या भागात अद्याप सूर्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. या भागाची लोकसंख्या एक लाखांच्या घरात गेली आहे. पाझर तलाव हाच येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. कमी पाऊस आणि तलावाजवळील विहिरीतून होत असलेल्या बेकायदा पाणी उपशामुळे तलावाची पातळी कमालीची कमी झालेली आहे. सध्या तलावात २५ ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पूर्वी आठवडय़ातून चार वेळा पाणी ग्रामस्थांना मिळायचे. आता आठवडय़ातून दोन वेळा तेसुद्धा फक्त ४५ मिनिटे पाणी लोकांना देण्यात येते. तलावातील गाळ काढला आणि तो खोदला तर पाण्याची पातळी वाढू शकणार आहे. हा तलाव जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. जर शासकीय पातळीवर ही कामे करायचे ठरवले तर वेळ लागणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वत: श्रमदानाने कामे करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी वसई-विरार महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले असून जिल्हा परिषदेकडे काम करू देण्याची परवानगी मागितली आहे. आयुक्तांनीही या कामाला ना हरकत प्रमाणपत्र देणार असल्याचे सांगितले आहे.
ही आजवरचीे सर्वात भीषण परिस्थितीे आहे. श्रमदानाने इतिहास घडविल्याची उदाहरणे आहेत. शासकीय दप्तर दिरंगाई सर्वाना माहीत आहे. त्यामुळे आम्ही स्वत: श्रमदानाने तलाव खोदून पाण्याची पातळी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा परवानगी मिळेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ हातात साहित्य घेऊन काम सुरू करतील. कारण हा आमच्या जगण्याचा प्रश्न आहे.
– कन्हैया भोईर, स्थानिक नगरसेवक