उल्हासनगरः रस्ते रूंदीकरण, कॉंक्रिटीकरण, भुयारी गटार अशा विविध कामांसाठी सध्या उल्हासनगरात खोदकाम सुरू आहे. महिनाभरापूर्वी उल्हास नगरातील खड्ड्यांनी दोन निष्पाप व्यक्तींचा जीव घेतला होता. त्यानंतर शहरातील खोदकाम काळजीपूर्वक केले जाईल अशी आशा होती. मात्र उल्हासनगर पुन्हा एकदा खोदलेल्या खड्ड्यात पडून एक वृद्ध व्यक्ती जखमी झाला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात ही घटना घडली. त्यामुळे या बेजबाबदार कारभारावर शहरातून संताप व्यक्त होतो आहे. उल्हासनगर शहरात सध्या विविध ठिकाणी खोदकाम सुरू आहे. अशाच एका खोदलेल्या खड्ड्यात पडून एक वृद्ध जखमी झाले आहेत. उल्हासनगर शहरातील कॅम्प ४ भागातील सेक्शन २८ येथील रामचंद फटका दुकानाजवळ शुक्रवारी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान एक अपघात घडला. येथे भुयारी गटारीच्या कामासाठी ६ फूट खोल खड्डा खोदला होता. या उघड्या खड्ड्यात एका वृद्ध व्यक्तीचा पाय घसरून ती पडली. त्यामुळे त्यांना डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना डोळ्यांनी कमी दिसत असल्याने ते नेहमीप्रमाणे अमृतवेला कार्यक्रमासाठी पहाटे घराबाहेर पडले होते. मात्र रस्त्यावर कोणतीही सूचना, सुरक्षा जाळी अथवा पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने उघडा खड्डा त्यांना दिसला नाही.

घटनेनंतर काही वेळाने तिथून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना खड्ड्यात पडलेल्या वृद्ध व्यक्तीलाबाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून संबंधित कंत्राटदार आणि महापालिकेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होतो आहे. खोदकामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने असे अपघात होत असून पालिकेला नागरिकांच्या जीवाची किंमत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. याआधी अनेक जण प्राणाला मुकले.

उल्हासनगर शहरातील खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. हिराघाट परिसरात झालेल्या अपघातात एका तरूण डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर कॅम्प पाच भागात एका तरूणाला खड्ड्यात पडून गंभीर दुखापत झाल्याने प्राण गमवावे लागले होते. तसेच एका खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी झाल्याचेही यापूर्वीच्या घटनेत समोर आले होते.

मात्र त्यानतंरही या खोदकामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. विविध कामांसाठी खोदकाम उल्हासनगर शहरात सध्या विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. त्यात काही कामांमध्ये दिरंगाई होत असल्याचा फटका नागरिकांना आणि विशेषतः वाहतुकीला बसतो आहे. पोलिसांचा सीसीटीव्ही प्रकल्प, भुयारी गटार, रस्ते रूंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण अशी अनेक कामे सध्या सुरू आहेत.