दिवा रेल्वेस्थानकाजवळ रुळांवर लोखंडी रॉड ठेवल्याच्या घटनेचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गर्दुल्ल्यांनी अवघ्या दोन हजार रुपयांच्या पैजेसाठी रेल्वेरुळांवर लोखंडी रॉड ठेवला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आयुक्त परमबीर सिंग यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात रेल्वे घातपाताच्या घटना उघडकीस येत असताना ठाण्यात घडलेल्या अशाच प्रकारामागचे धक्कादायक आणि काहीशी चीड आणणारे सत्य उघडकीस आले आहे. ५ जानेवारी रोजी दिवा रेल्वे स्थानकाजवळ रात्री १५ फूट लांबीचा रुळाचा तुकडा रेल्वे रुळांवर आढळला होता. सुदैवाने या घटनेमध्ये अनर्थ टळला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला होता. अखेर याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून काही तरुणांनी केवळ दोन हजार रूपयांच्या पैजेसाठी हा सर्व प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. रूळावर लोखंडी रॉड आणून ठेवण्याच्या कृत्यात पाचजणांचा समावेश होता. हे सर्वजण गर्दुल्ले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मौला मकानदार या व्यक्तीने त्यांच्याशी रूळांवर लोखंडी रॉड ठेवल्यास दोन हजार रूपये देईन, अशी पैज लावली होती.




मौला मकानदार याच्याशी पैज लागल्यानंतर दानिश अकबर शेख (वय २६), सूरज दिनेश भोसले (२५), मोहमद शब्बीर मोहम्मद नसीम शेख, नजीर उस्मान सय्यद, जयेश नागेश पारे (सर्व राहणार मुंब्रा, ठाणे) या पाचजणांनी लोखंडी पट्टी रूळांवर आणून टाकली. एखादी ट्रेन या पट्टीला धडकली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने हा अपघात टळला. दरम्यान, आता पाचही आरोपींना १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच मौला मकानदार याचा मुंबई आणि परिसरात रेल्वे रूळांवर दगड किंवा लोखंडी रॉड ठेवण्याच्या इतर घटनांमागेही हात आहे का, याचाही तपास सुरू आहे.
आरोपी मौला मकानदार हा रेल्वेच्या हद्दीत विविध गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. २४ जानेवारी रोजी पाच आरोपीने पैजेनुसार केलेले कृत्य आरोपी मौला मकानदार बाजूला बसून पहात असल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले. मौला मकानदार हा सध्या रेल्वेच्या एका गुन्ह्यात तळोजा कारागृहात बंदिस्त आहे. मकानदार याच्यावर विविध प्रकारचे ४० ते ५० गुन्हे दाखल आहेत. त्याने अशा प्रकारचे कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले यामागे कुठला घातपाचं प्रयत्न किंवा दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत काय याचा तपास पोलीस करीत आहेत. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर यांनी सांगितले की आम्ही तपास कामासाठी त्याचा ताबा घेणार असून त्याच्या चौकशीत आणखी सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यापूर्वी अशा प्रकारच्या सहा घटना घडल्या असून नवी मुंबई परिसरात तीन घटना घडल्याचे सांगत या घटनेशी मौला मकानदार याचा शोध ठाणे पोलीस करीत आहेत.