लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ‘यादव’ आडनाव असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ‘खान’ आडनावाचे बनावट खाते तयार करुन धार्मिक भावना भडकविण्यासाठी पाकिस्तान देशाचा उद्धार केल्याचा धक्काकायक प्रकार समोर आला आहे. तसेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. याप्रकरणी त्या तरुणाविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. या हल्ल्यात निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण जगात उमटू लागले आहेत. या अतिरेक्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण देशातील नागरिक करत आहेत. तसेच पाकिस्तान देशाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. अतिरेकी हल्ला झाल्यानंतर आता याचाच गैरफायदा काही समाजकंटक घेत असल्याचे समोर येत आहे. या समाजकंटकांकडून धार्मिक भावना भडकविण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. समाजमाध्यमांचा गैरवापर केले जात असल्याने धार्मिक भावनांचा उद्रेक होत आहे. असाच काहीसा प्रकार ठाण्यासारख्या शहरात झाला आहे. ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाचा गैरवापर करत धार्मिक भावना भडकविल्या आहेत. त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहे.

ठाण्यातील एका बाजारपेठेमधील दुकानात संबंधित तरुण कामाला आहे. तर यातील तक्रारदार हे बांधकामा संदर्भातील व्यवसायात आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मित्राच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट आली होती. खान आडनावाच्या खात्यावरून ती पोस्ट होती. यामध्ये पाकिस्तान देशाविषयी उद्धार केला होता. तसेच भारताविषयी आक्षेपार्ह विधान लिहीले होते. संबंधित व्यवसायिकाला त्याच्या मित्राने या पोस्टबाबत माहिती दिली. त्यांनी त्या तरुणाचे खाते तपासले असता, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह चित्रीकरण आणि व्यंगचित्र होती. त्यामुळे व्यवसायिक आणि त्याच्या साथिदारांनी त्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, तो तरुण बाजारपेठेती एका कपड्याच्या दुकानामध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ त्या तरुणाचा शोध घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचे आडनाव यादव असल्याचे सांगितले. तसेच, ते खाते बनावट असल्याची कबूली देखील त्याने दिली. त्यानंतर संबंधित व्यवसायिकाने त्या तरुणाला ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात व्यवसायिकाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९६ आणि २९९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.