‘डॉग्स वर्ल्ड इंडिया पेट कॅफे’ला प्राणिप्रेमींची पसंती

निखिल अहिरे

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

ठाणे : आपल्या पाळीव प्राण्यांसोबत काही वेळ घालवावा. त्यांच्यासमवेत एखाद्या ठिकाणी बसून त्यांच्या आणि आपल्याही आवडीच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यावा असे प्रत्येक प्राणिप्रेमींना कायम वाटत असते. पाळीव श्वान आणि मांजरींसमवेत सकाळी किंवा सायंकाळी फेरफटका मारताना असे एखादे ठिकाण टप्प्यातच असेल तर ते प्राणी पालकांना हवेच असते. पाळीव प्राण्यांना खेळण्यासाठी आणि त्यांना विविध पदार्थाची चव चाखता यावी यासाठी अशी एक विशिष्ट जागा ठाणेकरांना उपलब्ध झाली आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहापासून हाकेच्या अंतरावर शहरात पहिलेवहिले डॉग्स वल्र्ड इंडिया हे पाळीव प्राण्यांकरिताचे (पेट) कॅफे सुरू झाले आहे. श्वानप्रेमी अशी ओळख असलेले प्रमोद निंबाळकर आणि त्यांचा मुलगा जय यांनी हे कॅफे सुरू केले असून हे आगळेवेगळे ठिकाण प्राणिप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

 मागील काही वर्षांपासून भारतात ‘पेट कॅफे’ ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय होत आहे. अनेक प्राणिप्रेमींकडून या संकल्पनेचे स्वागतदेखील होत आहे. या पेट कॅफेमध्ये प्राण्यांचे स्वागतच तर होतेच तसेच प्राणिप्रेमींना त्यांच्या सहकारी प्राणिप्रेमींनाही भेटण्याची संधी मिळते. मुंबई शहरातील एखाददुसरा अपवाद वगळला तर महानगर पट्टय़ात असे कॅफे अगदीच अपवादाने पाहायला मिळतात. ठाण्यात मात्र निंबाळकर पितापुत्रांनी प्राणिप्रेमींची ही गरज भागवली आहे. प्रमोद निंबाळकर यांनी काही वर्षांपूर्वी पाळीव श्वानांना प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या बदलापूर येथील केंद्रात आजही पाळीव श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. श्वानांचा घरात वावर कसा असावा, ते अधिक हिंस्र होऊ नये तसेच श्वानांचे अनोळखी माणसांसमवेत वर्तन कसे असावे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचे काम निंबाळकर आजही करतात. ज्याप्रमाणे माणसांना त्यांच्या मित्रपरिवारामध्ये गेल्यावर एक आनंद मिळतो, काही वेळ तणावमुक्त असल्याची भावना निर्माण होते, अशाच पद्धतीने पाळीव प्राण्यांचेदेखील असते. त्यांनादेखील इतर प्राण्यांसमवेत खेळायला, वावरायला आवडते. मात्र, गर्दीने गजबजलेल्या शहरांमध्ये वावरताना पाळीव प्राणी हे भेदरलेले दिसून येतात. त्यांना दिवसातील काही काळ मनमोकळय़ा पद्धतीने घालवता यावा यासाठी एक जागा हवी, असा विचार प्रमोद आणि जय यांच्या मनात आला. त्यासाठी त्यांनी परदेशातील काही पेट कॅफेंना भेट दिली. त्यांची संरचना समजून घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्यात श्वानांकरिता पहिलेवहिले डॉग्स वल्र्ड इंडिया हे पेट कॅफे उभारले. या पेट कॅफेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळी ६ नंतर शहरातील अनेक नागरिक त्यांच्या श्वानांसह या कॅफेला भेट देत आहेत. श्वानांसाठी काही छोटेखानी खेळांचे तेथे आयोजन करण्यात आलेले असते. सर्व पाळीव श्वान या ठिकाणी मनमुराद बागडण्याचा आनंद घेतात. पाळीव श्वानांच्या सोयीनुसारच सगळय़ा गोष्टी कॅफेत उभारण्यात आल्या आहेत.

दैनंदिन कामामुळे घरातील पाळीव प्राण्यांना दररोज फेरफटका मारायला घेऊन जाणे अशक्य होते. तसेच वाहनांच्या गर्दीमध्ये घेऊन गेल्यावर प्राणी घाबरून जातात. काही वेळ आपल्या पाळीव प्राण्यासोबत थांबता येईल, अशी जागा नसल्याने अडचण निर्माण होते. मात्र या कॅफेमुळे  श्वानांसमवेत मोकळय़ा वातावरणात चांगला वेळ घालवता येत आहे. तसेच आमचे श्वानदेखील अगदी आनंदी दिसून येत असल्याच्या भावना काही प्राणिप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.

श्वानांसाठी पौष्टिक आहाराची सोय

श्वानांमध्ये अनेक प्रजाती आहेत. प्रत्येक प्रजातीला वेगवेगळय़ा जातींचे खाद्य लागते, असा अनेक नागरिकांचा समज आहे. मात्र श्वानांना घरगुती पद्धतीने बनविलेला आहारही त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत असतो. यानुसार प्रमोद यांनी प्राण्यांच्या आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत काही विशिष्ट खाद्यपदार्थ श्वानांसाठी कॅफेमध्ये ठेवले आहेत. यात विविध प्रकारचे केक, बर्फी, मांसाहारी पदार्थासह विविध पालेभाज्यांचा आणि फळांचा समावेश असलेले पदार्थ हे सर्व खाद्यपदार्थ कॅफेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे सर्व पदार्थ तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ठेवण्यात आले आहेत. यामुळे कॅफेत येणाऱ्या श्वानांना अनेक खाद्यपदार्थाची चव चाखायला मिळत आहे.

‘आमचा पाळीव प्राणी आमचा हिरो’ या ब्रीदवाक्याला अनुसरून डॉग्स वर्ल्ड इंडिया पाळीव प्राण्यांसाठी काम करत आहे. वाहनांनी गजबजलेल्या शहरांत पाळीव प्राणी रस्त्यांवरून फिरताना घाबरलेले दिसून येतात. त्यामुळे पाळीव श्वानांना दिवसातले किमान काही तास तरी खुल्या जागेत इतर श्वानांसोबत खेळता यावे या हेतूने कॅफेची उभारणी करण्यात आली आहे. माझ्याकडे विविध प्रजातींचे ३० श्वान आहेत. त्यांना माणसांमध्ये वावरताना कसे वागावे याचे मूलभूत शिक्षण मी स्वत: दिले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या कॅफेमध्येदेखील असे प्रशिक्षण वर्ग घेण्याचा मानस आहे. नागरिकांकडूनदेखील अशी जागा सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार हा कॅफे सुरू केला आहे. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

जय निंबाळकर, संचालक डॉग्स वर्ल्ड इंडिया कॅफे, ठाणे</strong>