ठाणे – किशोरवयीन महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, चांगल्या संधी आणि अभिव्यक्तीचा स्थिर टप्पा मिळावा. तसेच अन्न, आरोग्य, लिंग- शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने सेवा सहयोग फाऊंडेशनच्यावतीने किशोरी विकास प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत १२ ते १८ वयोगटातील किशोरी मुलींना शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक विकासासंबंधित प्रशिक्षण दिले जात असून नुकतेच ठाण्यात या उपक्रमातील प्रमुखांना या सत्राबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या माध्यमातून शहापूरातील दहा वस्त्या आणि गावामधील मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बालपणापासून किशोरावस्थेपर्यंतच्या काळात मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये बदल घडत असतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुलींच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या बाबींवर त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधण्याची आवश्यकता असते, याच उद्देशाने सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्यावतीने किशोरी विकास प्रकल्प राबविला जात आहे. १२ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींना शारीरिक, बौद्धिक आणि भावनिकरित्या सदृढ करण्याचे काम या उपक्रमांतर्गत केले जाते. नुकतेच या उपक्रमाचे १०० सत्रे पार पडली. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील १०० गाव आणि वस्त्यांमध्ये २५०० मुलींना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दहा गावांमध्ये सत्र सुरू करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने काही शहापूरातील प्रमुखांना या सत्राचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्यामार्फत शहापूरातील गाव, वस्त्यांमधील १२ ते १८ वयोगटातील मुलींना या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणातील सत्रांत नेमके काय ?

किशोरी विकास प्रकल्पातील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण तीन सत्रांत पार पडले. यामधील पहिले सत्र कुमार वयातील बदल हे होते. त्यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक बदल, सुरक्षित-असुरक्षित स्पर्श यावर अभ्यासपूर्ण आणि क्रियाशील माहिती देण्यात आली. ही माहिती डॉ.भावना मेस्त्री यांनी दिली. दुसरे सत्र अभ्यास कौशल्ये असून पूनम घरत यांनी सकारात्मक दृष्टिकोन, स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र, नियोजन आणि सातत्याने मिळणारे यश या बाबींची सखोल माहिती दिली. तर स्व-ओळख या तिसऱ्या सत्रांत योगेशचंद्र लोहोकरे स्वोट ॲनलिसिस (SWOT analysis), ध्येय निश्चिती अंतर्गत संघर्ष, स्वयंपूर्णता आणि आत्मस्वीकृती यावर चर्चा करण्यात आली. तसेच किरण देशमुख यांनी देखिल यावेळी मार्गदर्शन केले. तरी, प्रशिक्षण दिलेल्या महिला त्यांच्या वस्त्या, गावांमधील १२ ते १६ वयोगटातील मुलींचे सत्र घेणार आहेत.

शहापूर विभागातील नविन प्रमुखांना किशोरी कीटचे वाटप

या प्रशिक्षण सत्रावेळी नविन प्रमुखांना किशोरी किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन, पोट शेकवण्यासाठी पिशवी, स्वच्छतेची साधने आणि प्रथमोपचार साधने देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किशोरी विकास प्रकल्प हा १५ जुलैपासून शहापूर मधील १० गावांमध्ये सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत १२ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. – आरती नेमाणे, किशोरी विकास वसेवा स्वास्थ्य प्रकल्प व्यवस्थापक, सेवा सहयोग फाऊंडेशन