ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले मार्गावर काही दिवसांपुर्वी वृक्ष छाटणीची कामे करण्यात आली असून छाटणी केलेल्या फांद्या तसेच पालापाचोळा उचलण्यात आलेल्या नसल्यामुळे त्यांचे रस्त्याकडेला ढिग लागल्याचे चित्र होते. पावसामुळे पालापाचोळा सडून मच्छर होऊन साथीचे आजार पसरण्याची भिती व्यक्त होत होती. याबाबत लोकसत्ताने वृत्त प्रसारित करताच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने अखेर तेथील कचरा उचलला आहे. त्यामुळे हा परिसर कचरामुक्त झाल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार उद्भवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा हे शहर स्वच्छ ठेवण्याचे आदेश सातत्याने देत आहेत. असे असले तरी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून मात्र त्यांच्या आदेशाकडे कानाडोळा केला जात असल्याची बाब समोर आली होती. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले मार्गावर काही दिवसांपुर्वी वृक्ष छाटणीची कामे करण्यात आली होती. या कामानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या आणि पालापाचोळा मात्र रस्त्याकडेला जमा करून ठेवला. हा कचरा उचलण्यात आलेला नव्हता. यामुळे रस्त्याकडेला जागोजागी हे ढिग दिसून येत होते. पावसामुळे पालापाचोळा सडून मच्छर होऊन साथीचे आजार पसरण्याची भिती व्यक्त होत होती. तरीही वृक्ष प्राधिकरण विभागासह पालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत होते. शहरातील विविध भागात अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या संदर्भात लोकसत्ता मध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी तेथील कचरा उचलण्याचे काम केले. गुरुवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाले.